देखणी ती जीवने - महाराष्ट्रदिन विशेष

आज १ मे - महाराष्ट्रदिन. भाषावार प्रांतरचना करण्याच्या भारत सरकारच्या धोरणानुसार आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मोठ्या लढ्यानंतर आजच्या दिवशी १९६० साली मराठी भाषकांच्या - महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मराठी जनतेला महाराष्ट्राविषयी अभिमान वाटाव्या अशा बऱ्याच गोष्टी आपल्या राज्यात आहेत. बहुतेकवेळा महाराष्ट्राची संस्कृती, कला, साहित्य, संगीत, खाद्यसंस्कृती, सण-वार, गडकिल्ले यांचा आपल्याला अभिमान वाटतो. या गोष्टींबरोबरच महाराष्ट्राचं आणखी एक वैशिष्ट्य आणि सामर्थ्य म्हणजे आपल्या राज्याला असणारी वैचारिक परंपरा. स्वातंत्र्यपूर्व काळात विचारांचा वारसा जोपासणारे दोन प्रमुख प्रांत भारतात होते, त्यातील एक म्हणजे बंगाल आणि दुसरा महाराष्ट्र. आधी संत परंपरेचे विचार, पारतंत्र्यात असताना प्रखर राष्ट्रवादी आणि सुधारणावादी नेत्यांचे विचार, त्यानंतर चळवळीतले विचार, सामाजिक कार्यकर्त्यांचे विचार, शिक्षणतज्ज्ञांचे, पत्रकारांचे इत्यादी विचारांनी महाराष्ट्राला श्रीमंत केलं आहे. आज महाराष्ट्रदिनानिमित्त लिहायला बसल्यावरती विचारांची परंपरा सांगणाऱ्या चार व्यक्तिमत्वांची आठवण झाली. हा लेख या चौघांची थोडक्यात ओळख करून देण्यासाठी. या चौघांपैकी दोन जण पत्रकारितेतले, एक जण शेतीक्षेत्राशी संबंधित तर एक जण शिक्षणतज्ञ. कुठलाही देश-प्रदेश-समाज नशिबाने आणि गर्वाने छाती फुगवून मोठा होत नाही तर तो मोठा होतो तिथे राहणाऱ्या माणसांच्या विचारांनी आणि कार्याने. या चारही जणांचं कार्य समाजाला दिशादिग्दर्शन करण्याचं. बदलत्या काळामध्ये समाजाच्या बदलत्या समस्यांना मानवी चेहरा देण्याचं काम माध्यमांचं म्हणून पत्रकारिता महत्वाची, अन्न पिकवून समाजाचं पोट भरणाऱ्या आणि सातत्याने अडचणीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांमुळे शेती क्षेत्र महत्वाचं, उद्याच्या पिढीची जडणघडण करणारं शिक्षण क्षेत्रदेखील तितकंच महत्वाचं. म्हणूनच या चार थोर व्यक्ती, त्यांचं कार्य यांना महाराष्ट्रदिनी अभिवादन. पहिलं व्यक्तिमत्व - अरुण टिकेकर, त्यानंतर शरद जोशी, गोविंद तळवलकर आणि द.ना.धनागरे. हे चौघेही जण गेल्या एक-दिड वर्षात आपल्याला सोडून गेले, 'सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनि वसो' असे म्हणत यांचे देह महाराष्ट्राच्या सत्कारणी लागले.

​अरुण टिकेकर - बदलत्या काळाबरोबर प्रसारमाध्यमांचे समाजाचे मत घडवण्यामागील महत्व वाढत आहे. इलेकट्रॉनिक मीडिया देखील सध्या वेगाने फोफावत आहे. पण ज्यावेळी न्यूज चॅनेल्स नव्हती, टीव्ही नव्हता तेव्हा समाजाच्या एका वर्गाची बौद्धिक भूक भागवण्याचं काम मुद्रित प्रसारमाध्यमांनी म्हणजेच वृत्तपत्रं आणि नियतकालिकांनी केलं. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास बाळशास्त्री जांभेकरांच्या 'दर्पण'पासूनचा. या इतिहासातील दोन मानाची पानं ज्यांच्या नावावर लिहिली गेली आहेत ती दोन व्यक्तिमत्वं म्हणजे गोविंदराव तळवलकर आणि अरुण टिकेकर. या दोघांच्याही पत्रकारितेचा सुवर्णकाळ अलीकडचा नाही तर थोडा जुना, त्यामुळे त्यांचे वृत्तपत्रीय लिखाण आमच्या पिढीला 'थेट' वाचता नाही आलं. दोघांचीही जास्ती ओळख झाली ती त्यांच्या मृत्यूनंतर. १९ जानेवारी २०१६ ला टिकेकर गेले तर २१ मार्च २०१७ ला तळवलकर. समाजामध्ये झपाट्याने स्थित्यंतरं होत असताना प्रसारमाध्यमांची आदर्श भूमिका काय असावी हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठीच या दोन सारस्वतांची चरित्रं अभ्यासली पाहिजेत.

महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये आणि सामाजिक चळवळींमध्ये टिळक आणि आगरकर अशी दोन घराणी मानली तर, अरुण टिकेकर आगरकरी परंपरेतले. नेमस्त आणि समाजसुधारणांचा आग्रह धरणारे. सुरुवातीच्या काळात त्यांनी टाइम्स ग्रुपच्या संदर्भ विभागात नोकरी केली. त्यानंतर काही काळ ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये सहसंपादक म्हणून राहिले. मात्र टिकेकरांची खरी ओळख महाराष्ट्राला झाली ती 'लोकसत्ताचे' संपादक म्हणून, १९९१ साली. त्यानंतर ते ११ वर्षं या पदावरती राहिले. संपादक पदावरती असताना जवळपास १००० हून अधिक अग्रलेख त्यांनी लिहिले. 'संपादकीय लेख सोडून लोकसत्ताची इतर सर्व पाने सर्व विचारधारांच्या लेखनासाठी खुली आहेत' असं लोकसत्तामध्ये त्यांनी छापून आणलं. हाच टिकेकरांचा उदारमतवाद.​ लोकसत्ताची 'स्वतंत्र विचार, निर्भय उच्चार, चौफेर संचार' ही tagline टिकेकरांचीच. त्यांची पत्रकारिता या तीन तत्वांवर आधारितच राहिली. आजदेखील लोकसत्ताचे वाचक ज्या पुरवणीची शनिवारी आतुरतेने वाट पाहात असतात, त्या 'चतुरंग'ला खऱ्या अर्थाने आकार दिला तो टिकेकरांनीच. आज उजव्या, डाव्या विचारसरणीचे टोकाचे दुराग्रह पाहायला मिळत असताना, अरुण टिकेकर स्वतःला 'Left  to the center' म्हणायचे हे नमूद करायलाच पाहिजे. संपादक म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठाचा इतिहास लिहिण्याच्या प्रकल्पावर काम केले. त्यानंतर बुद्धिवंतांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध एशियाटिक सोसायटीच्या प्रमुखपदी ते कार्यरत होते. उदारमतवादी आणि लोकशाहीवादी हीच त्यांची खरी ओळख. त्यातूनच ते सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या द्यायला कधी बिचकले नाहीत. त्यांच्या संपादकपदाच्या कारकिर्दीतच १९९५ ते ९९ सालापर्यंत महाराष्ट्रात युती सरकार सत्तेवर होते, तेव्हा खुद्द हिंदुहृदयसम्राटांच्या विरोधात देखील त्यांची लेखणी जोरदार चालली. वैयक्तिक आयुष्यातदेखील ते उदारमतवादीच राहिले. त्यांच्या पत्नी एका लेखामध्ये लिहितात की - "मी 'मिसेस टिकेकर' अशी ओळख करून न देता 'मनीषा टिकेकर' अशी ओळख करून द्यावी असा त्यांचा (अरुण टिकेकरांचा) आग्रह असायचा आणि माझी तशी ओळख घडावी म्हणून ते माझ्यापाठी सदैव उभे राहिले. आमचे नाते भावनिक नाही तर बौद्धिक साह्चार्याच्या पायावरच उभे होते. " अशा या नेमस्त, निर्भीड बुद्धिवंतांची ओळख एका परिच्छेदात करून देणं शक्य नाही, ती करून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेलं साहित्य वाचायलाच हवं. अरुण टिकेकरांबद्दल जाणून घेतल्यानंतर इतकंच वाटतं की - 'आजकाल पाया पडावं अशी माणसं राहिली नाहीत' - असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे.

शरद जोशी - आज शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे या तत्वावर ज्यांनी महाराष्ट्रात अभूतपूर्व आंदोलन उभारलं त्या १९८० च्या दशकातील एका वादळाची - शरद जोशींची ओळख करून घ्यायला हवी. १९७० च्या दशकात जीन्स पॅन्ट - टी शर्ट घालणारा, प्रमाण मराठीत बोलणारा आणि 'जोशी' आडनाव असलेला कुणी नेता शेतकऱ्यांचा कैवारी होऊन आपलं उभं आयुष्य त्यातच व्यतीत करेल असं कुणालाही वाटलं नसेल. IFS असणाऱ्या जोशींनी १९७७ साली संयुक्त राष्ट्रसंघातील नोकरी सोडली आणि शेतीच्या प्रश्नावर काम करायचे असं ठरवून ते भारतात परतले. परतल्यावरती त्यांनी साडेतेवीस एकर कोरडवाहू शेती खरेदी केली. (पत्नीची बागायती शेती करण्याची इच्छा त्यांनी धुडकावून लावली होती). शेतीमध्ये प्रत्यक्ष प्रयोग करत त्यांनी शेतीचे अर्थशास्त्र समजून घेतले, त्यानंतर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचा दबावगट उभारून एकीकडे सरकारला शेतीविषयक धोरणे बदलायला लावली आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना अर्थसाक्षर केले. शेतकऱ्यांच्या तोंडी आयात, निर्यात, हमीभाव, जागतिकीकरण, स्पर्धा हे शब्द आले ते शरद जोशींच्या प्रबोधनामुळेच. 'इंडिया विरुद्ध भारत' ही संकल्पना मांडण्याचं 'पेटंट' जोशी यांचंच. पुरुष शेतकऱयांबरोबर महिला शेतकऱ्यांना आंदोलनांमध्ये सहभागी करून घेण्याचं कसब जोशी यांना साधलं होतं. १९८६ साली चांदवड येथे २ लाख महिलांना सोबत घेऊन शरद जोशी यांनी केलेलं आंदोलन चांगलंच गाजलं होतं. १९९१ च्याही खूप आधी शरद जोशी यांनी खुल्या अर्थव्यवस्थेचं महत्व जाणलं होतं आणि त्याचा शेती क्षेत्रासाठी ते नेहमीच आग्रह धरत आले. शेतकरी नेते असले तरी शरद जोशी त्या अर्थाने रांगडे नव्हते. संस्कृत आणि फ्रेंच भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. शेतकरी आंदोलनाच्या भाषणांतूनदेखील ते प्रमाण मराठीचाच वापर करत असत. शेतीवरच्या अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं. त्यांचं 'जग बदलणारी पुस्तके' हे गाजलेल्या पुस्तकांचा परिचय करून देणारं पुस्तकही वाचनीय आहे. शरद जोशी यांची ज्ञानलालसा, नवनवीन गोष्टी शिकण्याची त्यांची तयारी, जोखीम पत्करण्याचे साहस, विषयाच्या मुळापर्यंत जाण्याची वृत्ती, तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची तयारी, अफाट वाचन, तर्कशुध्दतेचा आग्रह आदी गुणामुळे त्यांचं आयुष्य समृद्ध आणि श्रीमंत झालं आणि त्यांनीच 'शेती आणि शेतकऱ्यांना देखील विचार असतो' हे सिद्ध केलं. शेतीच्या बाजारपेठेची शास्त्रशुद्ध मांडणी त्यांनी केली आणि त्याद्वारे शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांनी सरकारपुढे मांडल्या. विदर्भ मराठवाड्यातल्या अनेक घरांच्या देव्हाऱ्यात आज ते विराजमान आहेत. शेतकऱ्यांचं जीवन सुखी करण्याच्या अस्वस्थतेला वाट देत ते जीवन जगले. १२ डिसेंबर २०१५ ला जेव्हा हा धगधगता अंगार शांत झाला, तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जी गर्दी पुण्यामध्ये झाली, तेव्हा त्यांची श्रीमंती पुन्हा नव्याने महाराष्ट्राला कळली. म्हणूनच शरद जोशी यांचं आयुष्य 'जीवन त्यांना कळले हो' या कॅटेगिरीतलं.

​गोविंदराव तळवलकर - १९७८ साली शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन केलं, सरकार पाडण्याबाबतचं यशवंतराव चव्हाण यांचं व्यक्तिगत मत शरद पवारांना कळालं ते महाराष्ट्र टाइम्सच्या 'हे राज्य जावे ही श्रींची इच्छा' या अग्रलेखातून. हा अग्रलेख लिहिणाऱ्या संपादकाशीच पुढे १९९५ साली बाळासाहेब ठाकरेंनी चर्चा केली, ती युती सरकारचा नवीन मुख्यमंत्री ठरवण्यासाठी. या दोन घटनांवरून या संपादकाचा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात काय वकूब होता ते लक्षात येईल. ते संपादक म्हणजे 'ग्रंथोपजीवी' गोविंदराव तळवलकर. अग्रलेख हा वृत्तपत्राचा चेहरा असतो आणि तो संपादकाचा स्वतंत्र विचार असतो हे मराठी जनमानसावर बिंबवलं ते गोविंदरावांनी. ४५ वर्षांची (१९५० ते १९९५) पत्रकारिता, त्यातील बारा वर्षं  लोकसत्तामध्ये, ३३ वर्षं मटा मध्ये, या ३३ वर्षातील २७ वर्षं मटाचे संपादक आणि पत्रकारितेनंतर २२ वर्षं (१९९५ ते २०१७) पूर्णवेळ लेखक अशी तळवलकरांची तब्बल सात दशकांची कारकीर्द. ग्रंथोपासना आणि लेखन याच्यावर त्यांची इतकी श्रद्धा की २१ मार्च २०१७ (वय वर्षं - ९३)ला ते गेले, त्याच्या आदल्यादिवशी त्यांचं एक पुस्तक छपाईला गेलं. तळवलकर देखील टिकेकरांप्रमाणे आमच्या पिढीसाठी तसे जुनेच, पण आज जर तळवलकरांचं लेखन वाचलं तर लक्षात येतं की त्यांची लेखणी राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, अर्थकारण अशी चौफेर चालत असे. त्यातही त्यांच्या प्रत्येक लेखनाला राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदर असत. महाराष्ट्रातल्या बुद्धिजीवी वर्गाला अग्रलेखांची गोडी लावली आचार्य अत्रेंनी आणि ती वाढवली गोविंदराव तळवलकरांनी. संपादकपदाची ताकद आणि नैतिक दरारा टिकवून ठेवला तो त्यांनीच. त्या ताकदीची आज काय स्थिती आहे ते अजमावण्यासाठी आजची मराठी वृत्तपत्रे कोणती आणि त्यांचे संपादक कोण ? किती नावं आठवतायत ते पहा. राजकारण्यांमध्ये उठबस असली तरी तळवलकर राजकारण्यांना ठणकवण्यात कधी कमी पडले नाहीत. आचार्य विनोबा भावे ते गोळवलकर गुरुजी, सर्वांना तळवलंकरांच्या अग्रलेखाचा दणका मिळालाच. १९९५ नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले, पण त्यांचे लेखनकार्य अविरत सुरु राहिले. अलिकडच्या काही वर्षांमध्ये त्यांनी साधना साप्ताहिकातून एकूण १७० लेख लिहिले. आज पत्रकारितेत असलेल्या दोन पिढ्या गोविंदरावांच्या हाताखाली घडल्या. तर्ककठोरता, भाषेच्या बाबतीतला सौंदर्यवाद, भावनेला दूर ठेवून विश्लेषण करण्याची हातोटी, उदारमतवाद, गरजेपुरता संवाद आणि ज्ञानोपासनेवरील अव्यभिचारी निष्ठा यामुळेच गोविंदराव तळवलकर मराठी पत्रकारितेच्या इतिहासात ध्रुवतारा बनून राहतील. अलिकडच्या काळामध्ये त्यांना दर तीन-चार दिवसांनी डोळ्यांमध्ये इंजेक्शन घ्यायला लागायचे, तरीही शेवटपर्यंत ते सरस्वतीच्या पूजेमध्ये दंग होते. बा.भ. बोरकर म्हणतात - 'देखणा देहांत जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा'. वर्तमानात आणि भविष्यात जेव्हा विचारांची रात्र होईल तेव्हा गोविंदराव तळवलकर यांनी पेरलेला विचारांचा वारसा अभ्यासायला पाहिजे. टिकेकर आणि तळवलकर यांना अभिवादन म्हणून तरी उदारमतवाद, विचार आणि लोकशाही यांचा आदर करायला पाहिजे.​

द. ना. धनागरे - काही व्यक्तींना एखादे पद किंवा पुरस्कार मिळाला की त्यांचा समाजातील मान वाढतो, या उलट एखादं पद जर विशिष्ट एका व्यक्तीनं भूषवलं तर त्या पदाची प्रतिष्ठा वाढते. महाराष्ट्रात शिक्षणक्षेत्रातील अनेकांनी 'कुलगुरू' या पदाची प्रतिष्ठा वाढवली, त्यातील एक कुलगुरू म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.  द. ना. (दत्तात्रय नारायण) धनागरे. समाजशास्त्राचे गाढे संशोधक, अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. डॉ. धनागरेंची ओळख महाराष्ट्राला कमी असली तरी त्यांची ख्याती अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांतून पसरली आहे. १९३६ साली वाशीम गावातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मून देखील त्यांनी अमेरिकेतल्या MIT मधून आणि ब्रिटनमधल्या ससेक्स विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. भारतात परतल्यानंतर त्यांनी आग्रा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ आणि आयआयटी कानपुर आदी संस्थांतून अध्यापन केले. १९२० ते १९५० या काळातील शेतकरी चळवळ हा त्याचा सुरुवातीचा अभ्यासाचा विषय. कुटुंबव्यवस्था, चळवळी, आंदोलनं, उच्चशिक्षणक्षेत्र, भ्रष्टाचार, पर्यावरण आदी विषयांवर त्यांनी समाजशात्राच्या दृष्टीने संशोधन केलं. समाजशास्त्र या विषयाला त्यांनी सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आदी परिमाण देत त्यांचं संशोधन अधिक सखोल केलं. अलीकडेच शरद जोशींच्या चळवळीचा अभ्यास करून डॉ. धनागरे यांनी इंग्रजीमधून पुस्तक लिहिलं. रा.स्व. संघाची पार्श्वभूमी असूनही त्यांनी आपल्या संशोधनाला विशिष्ट दिशेने नेण्याचा प्रयत्न केला नाही. भारतात बुद्धिवंतांचं साप्ताहिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या - 'इकोनॉमीक अँड पॉलीटिकल वीकली (EPW)' या साप्ताहिकातून त्यांनी प्रदीर्घकाळ लेखन केलं. काही काळ ते भारतीय समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष राहिले. २०१२ साली वयाच्या ७६ व्या वर्षी Indian Institute of Advanced Studies या संस्थेची विद्यावृत्ती घेऊन ते संशोधनासाठी दोन वर्षं सिमला इथं वास्तव्यास राहिले.  शिक्षणक्षेत्रात मात्र त्यांचे नाव गाजले ते त्यांच्या कुलगुरूपदाच्या कारकिर्दीसाठी (१९९५ ते २०००, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर). सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे शिक्षण आणि सहकार क्षेत्रातल्या सम्राटांचे जिल्हे, या जिल्यांसाठीचं विद्यापीठ म्हणजे शिवाजी विद्यापीठ. या सम्राटांचे हितसंबंध, प्राध्यापकांच्या संघटना, नोकऱ्या-बदल्या यांसाठी पैसे घेऊन काम करणारे दलाल, विद्यापीठातील बेशिस्त, मार्कांमध्ये फेरफार करणारी कर्मचाऱ्यांची साखळी अशा सर्व भ्रष्टाचाराविरोधात डॉ. धनागरे कठोर प्रशासक म्हणून उभे राहिले. कॉपी प्रकारांच्या विरोधात कठोर शासन करण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या या कठोर भूमिकेमुळे ज्यांच्या हितसंबंधांना बाधा आली ते लोक धनागरेंच्या विरोधात एकवटले आणि त्यांनी 'धनागरे हटाव' मोहीम चालवली. अगदी कुलगुरूंच्या केबिनमध्ये फटाके वाजवण्यापासून, कुलगुरूंना घरात घुसुन शिवीगाळ करण्यापर्यंत या सम्राटांनी आणि त्यांच्या प्राध्यापकांनी उद्योग केले. या काळामध्ये लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स ही दोन वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक, तसेच कुलपती डॉ. पी.सी. अलेक्झांडर डॉ. धनगरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मोर्चे, निषेधसभा, शिव्याशाप, निंदानालस्ती यांचा सामना करत धनागरेंनी पाच वर्षाचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. निवृत्तीनंतर देखील लेखन, वाचन, संशोधन यामध्ये ते व्यस्त राहिले. सामाजिकशास्त्रांच्या अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष आणि व्यावसायिक अभ्यासाचे माजवले जाणारे अवास्तव स्तोम, तसेच उच्चशिक्षण क्षेत्राचं होत असलेलं बाजारीकरण यांविषयी डॉ. धनागरे नेहमीच बोलत असत. काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू स्वतःचे पद वाचवण्यासाठी राजकारण्यांचे उंबरे झिजवताना आपण पाहिले. तसेच पुणे विद्यापीठाच्या एका कुलगुरूंनी दोन वर्षांत आपल्या कुलगुरूपदाचा गाशा गुंडाळत सत्ताधाऱ्यांच्या सोबतीने दिल्ली (नियोजन आयोग) गाठली आणि बदलेल्या सत्ताधाऱ्यांच्या मदतीने (विचारधारेचा यू टर्न घेत) राज्यसभा गाठली. आजही कुलगुरूपदासाठी कशा पद्धतीने लॉबिंग चालतं ते आपण ऐकत असतोच. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. द. ना. धनागरे उठून दिसतात ते त्यांच्या शिक्षणक्षेत्रावरील आणि ज्ञानोपासनेवरील निष्ठेमुळे. भविष्यात जेव्हा जेव्हा बिनकण्याचे गुरुवर्य आपल्याला दिसतील तेव्हा धनगरेंसारख्या सन्माननीय कुलगुरुंची आठवण निश्चित होईल. ७ मार्च २०१७ रोजी डॉ. धनागरे आपल्याला सोडून गेले.

'देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती', बोरकरांच्या या ओळींप्रमाणे ही चारही व्यक्तिमत्वे म्हणजे ध्यासपंथावर चालणारी ध्येयवेडी माणसे होती. कोणत्याही एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास, चौफेर वाचन त्यानंतर त्या विषयाची विचारपूर्वक मांडणी, या अभ्यासातून आलेला उदारमतवादी दृष्टिकोन आणि अंगी बाणवलेली नम्रता, तसेच आयुष्याच्या शेवटपर्यंत लेखन-वाचन यात रमून जाणे, हे काही गुणविशेष या चारही जणांच्या अंगी होते. काळाच्या ओघात हे चौघेहीजण आणि त्यांचं कार्य पडद्याआड जाईल. पण बुद्धिवंतांना 'सो कॉल्ड आणि तथाकथित' अशी विशेषणं लावून मोडीत काढण्याची फ़ॅशन रुजत असताना या चारही जणांच्या कार्यातून ज्ञानसाधनेचा संदेश आपण घेतला पाहिजे. ज्ञानसाधना ही वर्षानुवर्षं करायची तपश्चर्या असते, ती एका रात्रीत पूर्ण होत नाही आणि म्हणूनच अभ्यासाशिवाय व्यक्त होणं हे धोक्याचं असतं. समाजमाध्यमांचा (Social Media) चा वापर वाढत असताना 'व्यक्त' होण्याच्या सभ्य प्रकारांचा देखील प्रसार व्हायला हवा. 'ज्या समाजातील राजकारणी आणि नेते आपल्यामधील बुद्धिवंतांची जाहीर कुचेष्टा करतात, त्या समाजाची प्रतिष्ठा धोक्यात आलेली असते', अरुण टिकेकरांनी लिहिलेलं हे वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे. राज्य असो किंवा राष्ट्र, ह्या गोष्टी आपल्याला वारसा म्हणून मिळालेल्या असतात. हा वारसा जपलेला असतो असंख्य लोकांनी आपल्या कष्टातून आणि संपूर्ण आयुष्यभर एका विशिष्ट ध्येयमार्गावरती चालून. तो वारसा निदान जपण्याची आणि जमल्यास वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक सजग आणि सुशिक्षित नागरिकावर असते. महाराष्ट्रदिनी हाच एक विचार. सुशिक्षिततेची आणि सुसंस्कृततेची व्याख्या या चार व्यक्तिमत्वांच्या अभ्यासातून आपल्याला नक्कीच कळेल. या चार नररत्नांचं कार्य पाहून महाराष्ट्रगीतातील या ओळींचा अर्थ कळतो -
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें
सद्‍भावांचींच भव्य दिव्य आगरें ।
रत्‍नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळिं नुरे
रमणीची कूस जिथें नृमणिखनि ठरे ।
शुद्ध तिचें शीलहि उजळवि गृहा गृहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
(नृमणि - नररत्न, थोर पुरुष, खनि - खाण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

आईचा साठावा वाढदिवस