पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

आपण बोलत असताना अनेक शब्द सहजरित्या वापरत असतो किंवा इतरांकडून ऐकत असतो, पण त्यांच्या अर्थ आपल्याला पूर्णपणे समजलेला असतोच असे नाही किंवा तो अर्थ समजून घेण्याची तसदी आपण घेतोच असे नाही. काही दिवसांपूर्वी गाजत असलेला 'असहिष्णू' शब्दच घ्या, 'असहिष्णुता' म्हणजे काय ? असा विचार खोलवर जाऊन आपण कधी केलाय का ? विचार केला तरी त्या शब्दाचा व्यापक अर्थ आपल्याला समजेलच असे नाही. असाच आणखी एक शब्द आहे 'पुरोगामी'. 'महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे' असे आपण बऱ्याचवेळा ऐकले असेल, पण म्हणजे नक्की काय हे माहिती आहे काय आपल्याला ? म्हणूनच आज आपण प्रश्न विचारुयात आपल्यालाच 'पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?'

        पुरोगामी शब्दाची एकच अशी व्याख्या करता येणार नाही पण शब्दशः अर्थ घ्यायचा तर 'पुरः' म्हणजे 'पुढे' आणि 'गामी' म्हणजे 'जाणारा', पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा. पुरोगामी या शब्दाबरोबर इतर शब्द जोडले जातात, जसे की पुरोगामी विचार, पुरोगामी चळवळ, पुरोगामी पक्ष, संस्था, व्यक्ती, शक्ती इत्यादी. पण पुढे म्हणजे नक्की 'कुठे' हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. रूढार्थाने 'पुरोगामी' शब्द सामाजिक, नैतिक, वैचारिक आणि मानसिक दृष्टीने प्रगत होणे या अर्थी वापरला जातो. उदाहरणेच द्यायची झाली तर स्त्रियांनी सती जाण्याची पद्धत बंद होणे, केशवपन पद्धती बंद होणे, स्त्रियांसाठी शिक्षण मिळण्याची सोय होणे, विधवा पुनर्विवाह, खालच्या जातीच्या मानल्या गेलेल्यांना मंदिराचे प्रवेश मिळणे आणि शिक्षण मिळणे, वैज्ञानिक दृष्टीचा  अंगिकार इथेपासून ते दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा लागू होऊन त्या कायद्याच्या आधारे अनेक गुन्हे दाखल होऊन पीडितांना न्याय मिळणे ही सर्व 'पुढे  जाणारी ' पावले आहेत म्हणूनच ती पुरोगामी आहेत. 'पुढचा'  म्हणजेच 'पुरोगामी' विचार करताना 'मागच्या' गोष्टींचे पुनरावलोकन, चिकित्सा आणि त्यातल्या सर्वार्थाने चुकीच्या, वाईट, अन्यायकारक गोष्टींचे निर्मूलन आवश्यक ठरते. भारतीय संस्कृतीचा, रूढी-परंपरांचा विचार करता जातीभेद, स्त्री आणि शूद्रांवरचे अन्याय, धर्मांधता, ग्रंथप्रामाण्यता, दैववादी दृष्टिकोन, अनेक अमानवी प्रथा-परंपरांचे उदात्तीकरण-अंधानुकरण इत्यादी काही चुकीच्या गोष्टी सहज सांगता येतील. या सर्व गोष्टींना मूठमाती देण्याचा विचार म्हणजे पुरोगामी विचार, असा विचार  मांडणारे लोक किंवा लोकांचे संघटन म्हणजे पुरोगामी संस्था, चळवळी. रूढार्थाने आर्थिकदृष्ट्या पुढे जाणे (श्रीमंत होणे) म्हणजे पुरोगामित्व असे कधीच मांडले गेलेलं नाही. पुरोगामित्व मुख्यत्वे सामाजिक विषयांशी आणि म्हणूनच जनसामान्यांशी, मागासलेल्यांशी निगडीत राहिले आहे. ( त्यामुळेच कदाचित पुरोगामी विचार आर्थिकदृष्ट्या चुकीचा असतो असा समज आहे. )

        महाराष्ट्राचे पुरोगामित्व: 'महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे' म्हणजे काय तर महाराष्ट्राला पुरोगामी विचार, माणसे, संस्था, चळवळी यांची परंपरा आहे. तत्कालीन सामाजिक पद्धती, रूढी यांच्यावरती अभंगातून कोरडे ओढणारे आणि समाजाला सन्मार्गावर चालण्याचा उपदेश करणारे संत यांच्यापासून ही परंपरा सुरु होते असे मानायला पाहिजे. 'नवस सायासे होते संतती, मग करणे का लागावे पती' असे सांगणारे संत तुकाराम, 'लेकुरे उदंड झाली आणि लक्ष्मी पळून गेली' म्हणणारे संत रामदास, भारूडातून प्रबोधन करणारे संत एकनाथ आदि संतांपासून ही परंपरा सुरु होते. जातीपातींच्या बाहेर विचार करून जनतेच्या कल्याणासाठीच राज्य करणारे छ. शिवराय, छ. शाहू महाराज याच परंपरेतले, स्त्री शिक्षण आणि समाजसुधारणेचा वसा घेतलेले रानडे आणि फुले दाम्पत्य, सुधारकी विचार मांडणारे आगरकर, ग्रंथप्रामाण्य-दैववाद-धर्मांधता आदींवर कडाडणारे स्वा. सावरकर (देखील), स्त्री-शिक्षण - कुटुंबनियोजन आदी गोष्टींवर कार्य केलेले र. धों. कर्वे आणि कुटुंबीय इत्यादी मंडळी देखील या पुरोगामी परंपरेचे पाईक. हे सर्व बिनीचे शिलेदार म्हटले तर या सर्वांसोबत कार्य करणारे असंख्य कार्यकर्ते, शिक्षक, लेखक, कवी इत्यादी लोक देखील या परंपरेतलेच. थोड्या पुढील काळामध्ये काम करणारे बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी, नंतरच्या काळातील एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, यदुनाथ थत्ते, वसंत बापट, मृणालताई गोरे इत्यादी लोकांनी प्रचलित परंपरांविरोधात उभे ठाकत आणि स्वतःच्या वैयक्तिक जीवनात उच्च नैतिक मूल्यांचे आचरण करत पुरोगामी परंपरा पुढे चालू ठेवली. मागासलेल्यांचे आणि स्त्रियांचे आयुष्य सुधारण्याचे प्रयत्न या परंपरेकडून झाले. अलीकडच्या काळातील अभिनेते निळू फुले, श्रीराम लागू तसेच सर्वाचे लाडके पु. ल. देशपांडे हे देखील पुरोगामी विचारांचे. ( अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या मसुद्यावर १९८८ साली पहिली सही करून पुढाकार घेणारे पु. ल. देशपांडे होते. ) (सामाजिक कृतज्ञता निधी उभा करण्यासाठी महाराष्ट्रभर नाटकाचे दौरे करणारे निळू फुले आणि श्रीराम लागू देखील या परंपरेस पुढे नेणारेच.) मुस्लिम समाजातील चुकीच्या परंपरांना आव्हान देणारे हमीद दलवाई आणि अंधश्रद्धा निर्मूलनाद्वारे धर्मचिकित्सा, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रसार करणारे नरेंद दाभोलकर देखील पुरोगामीच. ज्याठिकाणी कुष्ठरोग्यांचे नातेवाईकच आपल्या माणसांना दूर लोटत होते तेव्हा त्या माणसांचे 'बाबा' झालेले आमटे कुटुंबीय आणि त्यांच्याप्रमाणेच अशक्त, अपंग, दुर्बल आदी घटकांना सोबत करणारे असंख्य सामाजिक कार्यकर्ते या पुरोगामित्वाच्या पालखीचे भोई आहेत. सामाजिक आशय असणारे 'साधना' साप्ताहिक असो किंवा स्त्री चळवळीला प्रोत्साहन देणारे 'मिळून साऱ्याजणी' मासिक किंवा इतर माध्यमे यांनी देखील पुरोगामित्व ठामपणे प्रतिपादिले आहेच. ( दुष्काळग्रस्तांसाठी  'नाम फाउंडेशन' सुरु करणारे अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे सुद्धा जात-धर्माच्या पलीकडे जाऊन मानव कल्याणाचे काम करत आहेत ते देखील या परंपरेला साजेसे कामच करत आहेत नाही का ?)

        समाजाचे पुरोगामित्व: पुरोगामित्वाची इतकी मोठी परंपरा असूनदेखील आपण समाज म्हणून 'पुरोगामी' आहोत का ? दुर्दैवाने आपल्या समाजाची पुरोगामित्वाकडे वाटचाल करण्याची गती खूप कमी आहे, या वाटचालीमध्ये असंख्य अडथळे आहेत आणि आर्थिक प्रगतीचा त्यावरती प्रभाव आहे. आर्थिक प्रगतीबरोबर पुरोगामित्वाकडे वाटचाल होतेच असे नाही. भौतिक प्रगतीच्या कोलाहलात 'प्रबोधनाचा' आवाज क्षीण आहे आणि म्हणूनच 'प्रतिगामित्वाची' झलक रोज आजूबाजूला दिसत आहे. स्त्रीने प्रवेश केल्यावर देवळे दुधाच्या अभिषेकने शुध्द (?) केली जात आहेत, जीन्स घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घातली जात आहे , आंतरजातीय विवाह केल्यावर खून पडत आहेत, मंदिरातला प्रसाद स्त्री बचतगटांनी बनविण्यास आक्षेप घेतले जात आहेत, साहित्य संमेलनाध्यक्ष चुकीचे बोलले तर त्यांना जीवे मारण्याच्या 'सनातन' धमक्या दिल्या जात आहेत, २१ व्या शतकात खुनाचा तपास करण्यासाठी 'planchet' चा वापर होतोय. धर्मांध, जात्यंध 'प्रतिगामित्वाचे कारले', पुरोगामित्वाच्या आणि प्रबोधनाच्या तुपात - तेलात तळलं आणि साखरेत घोळले तरी ते कडू आणि विषारीच होत आहे. मूलतः सामाजिक बदलांना सामोरे जायला आणि ते स्वतःच्या घरापासून लागू करायला बहुसंख्यांचा विरोध असतो, उघड विरोध नसला तरी ती सहज आणि नैसर्गिक प्रवृत्ती असते. म्हणूनच जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात - प्रदेशात पुरोगामित्वाचा आवाज क्षीण असतो ( खरे बोलल्याबद्दल येशु आणि Socrates ला देहदंड दिला जातो). पुरोगाम्यांचे राजकारण - सत्ताकारण खूप यशस्वी होताना दिसत नाही. सत्ताधाऱ्याना पुरोगामी विचार पटले तरी लोकक्षोभाला सामोरे जाण्याची हिम्मत नसल्याने आणि मतांचे राजकारण सांभाळायचं असल्याने कोणतेही सरकार उघडपणे आणि ठामपणे पुरोगामी विचार पुढे नेताना दिसत नाही . ( एक पुरोगामी नेता मारला गेल्यावर कुठे एक कायदा मंजूर होतो. )

        वैयक्तिक पुरोगामित्व: आदिम काळात नग्नपणे हिंडणाऱ्या माणसाला कपडे घालायचे महत्व काही काळाने पटलं, बहुपती  आणि बहुपत्नीत्व असणाऱ्या समाजाला एक पती/पत्नी ची गरज नंतरच्या काळात वाटू लागली, स्त्रियांना शिक्षण न दिल्याने आणि घरात कोंडून ठेवल्याने कुठल्याच प्रकारे धर्माचे भले झाले नाही आणि देव तर मुळीच प्रसन्न झाला नाही, खालच्या जातीच्या मानल्या गेलेल्या लोकांना छळून कोणाच्याच पुण्याचे गाठोडे मोठे झाले नाही आणि उच्चवर्णीय सोडून इतर जातीतल्या माणसांनी पूजा केली म्हणून विठ्ठल कधीच कोपला नाही. हे सगळे लोकांना कळते पण उशिरानेच, वळते तर आणखी उशिराने, पण तोपर्यंत या गैरसमजुती-प्रथा-परंपरा अनेकांचे आयुष्य उध्वस्त करतात. बंडखोर प्रवृत्तीचे लोक, सुधारक या परंपरांना आव्हान देतात म्हणून तर समाजाचे 'एक पाऊल पुढे पडते'. ( उदाहरणच द्यायचे झाले तर डॉ. आनंदीबाई जोशी आणि त्यांच्या नवऱ्याने बंडखोर वृत्तीने शिक्षणाचा ध्यास घेतल्याने, पहिली महिला डॉक्टर जन्माला आली ). प्रश्न विचारणे, त्यांची उत्तरे शोधणे आणि मिळालेल्या उत्तरांशी प्रामाणिक राहात जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल करणे याद्वारेच मनुष्यप्राणी आणि समाज 'पुढे' जात आहे. पुरोगामी आणि प्रतिगामी या शब्दांना राजकारणाच्या दृष्टीने पाहिले तर आरोप-प्रत्यारोप आणि फुकाचा शब्दच्छ्ल यापलीकडे हाती काही लागणार  नाही. पण याच शब्दांना सामाजिक दृष्टीने पाहिले तर बऱ्याच संकल्पना, धारणा, गृहीतके स्पष्ट होतात. काहीतरी चुकत आहे आणि अहिताचे आहे हे कळल्यावर 'दुरुस्ती करणे' किंवा  'बदल करणे' म्हणजेच पुरोगामित्वाकडे वाटचाल. वैयक्तिकरित्या पुरोगामी व्हायचे तर काही सवयी लावून घ्यायला पाहिजेत. १. समाजहिताचा विचार करताना जात-धर्म यांच्या पलीकडे जाऊन विचार करणे. २. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात स्त्री-प्रतिष्ठा जपणे. ३. वैज्ञानिक दृष्टिकोनातून घटनांची चिकित्सा करणे. ४. धर्म-चिकित्सा म्हणजे पाप असे न मानणे. ५. सामाजिक जाणीवा समृद्ध करत, पर्यावरण रक्षण करणे. ६. राजकीय मत बनवताना उच्च नैतिकतेचा आग्रह धरणे. ७. मुख्य म्हणजे समाजभान असणे . एवढ्याच नव्हे तर इतर अनेक मार्गांनी पुरोगामी म्हणून जगता येतं. असे जगणे, इतरांना जगण्यास प्रवृत्त करणे आणि असे जगणारयांचा आदर करणे  हे सामान्यांच्या हातात असते.

         बाकी 'पुरोगामी' शब्दाचा अर्थ कळला तर ठीक आहे, नाही कळला तरी 'काळ पुरोगामीच असतो', तो तुम्हाला पुढे नेतोच. 'थोडे थोडे तरी पुरोगामी ' होण्यासाठी शुभेच्छा.

(लेख लिहित असतानाच एका संघटनेने प्रत्येक गावात राममंदिर बांधण्याची घोषणा केली अशी बातमी आली, आता या घोषणेला पुरोगामी ठरवायचं का प्रतिगामी एवढे कळले तरी …… )

टिप्पण्या

  1. खूप सुंदर लेख होता मात्र प्रत्येक गावात राम मंदिर त्याच्याविषयी टिपणी बरोबर वाटले नाही. प्रत्येक धर्मियांचा तसा आग्रह असतो मग तुम्हाला राम मंदिर बाबत आक्षेप असायचे काही कारण नाही. पुरोगामी तत्वज्ञानी लोकांच्या बाबतीत ब्राह्मणद्वेष हा पाया दिसून येतो. त्या देशात अशा काही घटना या समाजाने केलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी द्वेष असण विशेष नाही. मात्र त्यांच्या विषयी असलेल्या रागामुळे ओरिजनल सनातन धर्माची बदनामी आपण करत नाही का याचा विचार खऱ्या भारतीयांनी करणे आवश्यक आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण पुनश्च लेख निःपक्ष व प्रामाणिकपणे अभ्यासल्यास आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळावे.

      हटवा
  2. मी जर हा एखाद्या धर्माचा, संस्थेचा, पक्षाचा पाईक मानून जर हा लेख वाचला तर नक्कीच काही गोष्ठी खटकातील, नक्कीच असाच वाटणार की ते हे करतात ते चालत आम्ही हे केलं की लगेच वाईट वाटत वगैरे वगैरे..
    पण मी जर फकत एक माणूस मानून वाचलं तर नक्कीच हा लेख बरोबर वाटेल, आणि तीच गरज आहे सध्याला माणूस होण्याची, पाहिलं पाऊल टाकण नक्की त्रासदायकच असतं, पण म्हणूनच इतिहासात त्याला जागा मिळते.

    खूप छान

    उत्तर द्याहटवा
  3. हे फक्त हिंदूंनाच लागू आहे. दलवाई साहेबांच्या नंतर कोणी पुरोगामी झाल्याचे तिकडे ऐकले नाही आमच्या न्यायालयांनी परंपरागत तरी प्रवेशास बंदी असलेल्या शबरीमला मंदिरात देखील स्त्रियांना प्रवेश दिला आम्ही पुरोगामी म्हणून त्याचे स्वागत देखील केली मात्र बऱ्याच ठिकाणी आमच्या मुलांनी न कपाळावर गंध लावला की तो हिंदूंच्या कट्टर वादाचे प्रतीक ठरतो मात्र कोणी टोपी घालून आले किंवा गळ्यात एखादे पेंडंट घालून आले तर ते त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा किंवा त्यांच्या धर्म शिक्षणाचा प्रभाव म्हणून आम्हाला कौतुकाने पहावयास लागते यातून कोणती पुरोगामित्व सिद्ध होते याची काही माहिती मिळेल का
    आकडेवारी सहित बोलायचं झालं तर 90% हिंदू धर्मियांना धर्म शिक्षणाची माहिती नाही मात्र 90 टक्के इतर कट्टर धर्मियांना र्मियांना आपल्‍या धर्माबाबत बाळकडू मिळत असते त्यांना जरा जास्त पुरोगामित्वाची गरज आहे आणि ते त्यांनाच शिकवावे अशी नम्र विनंती आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. छान लेख. रामाची पूजा करणे , मंदिर बांधणे , सनातन धर्माचे जतन करणे हे पुरोगामी च आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचा साठावा वाढदिवस

देखणी ती जीवने - महाराष्ट्रदिन विशेष