अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे

अनादी पासून अनंताकडे वाहत जाणाऱ्या कालप्रवाहामध्ये ३६५ दिवसांच्या एका वर्षाचे संपणे म्हणजे अगदीच क्षुल्लक, पण व्यक्ती आणि समाज यांच्यासाठी एका वर्षाचे संपणे म्हणजे मोठे कालांतर. कालगणनेच्या वर्षामध्ये पडणारा हा छोटा बदल नव्याने जगण्याची उमेद देतो, नवी ऊर्जा देतो. यश आणि सुख, आणि या दोन्हींच्या बरोबर येणारी मानसिक शांतता, समृद्धी, स्थैर्य यासाठी प्रत्येक व्यक्ती जगत असते, धावत असते. माणसे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका निभावत असतात, कधी घरातली भूमिका तर कधी बाहेरची. आधी विद्यार्जन आणि नंतर अर्थार्जन असाच अनेकांचा प्रवास असतो. या प्रवासामध्येच प्रत्येकाच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि वैचारिक भूमिका, मतं तयार होत असतात. या भूमिका असलेल्या माणसांनीच बनतो समाज आणि या भूमिकांवरच अवलंबून असते समाजाचं सामूहिक सुख. वैयक्तिक यशापलीकडेही काळाच्या ओघात टिकून राहण्यासाठी सामूहिक यश महत्वाचं ठरतं. व्यक्ती आणि समाज धावत असताना कोणत्या ना कोणत्या कारणाने मनांमध्ये, विचारांमध्ये अशुद्धता निर्माण होते. आणि हीच अशुद्धता मग वैयक्तिक आणि सामूहिक सुखाच्या आड येते. या सामूहिक अशुद्धतेची उदाहरणेच द्यायची तर - एका समाजाचा दुसऱ्या समाजाविषयी असलेला राग (जातीय आणि धार्मिक तेढ ), जुनाट आणि परंपरेने रुजलेल्या चुकीच्या प्रथा ( अंधश्रद्धा ), व्यवस्थेनं काही जणांना भेदभावामुळे नाकारणं (आर्थिक मागासलेपण, गरिबी) इत्यादी.  वैयक्तिक आयुष्यात देखील क्रोध, मोह, मत्सर, निष्काळजीपणा, इगो इत्यादी अशुद्धता असतातच. या अशुद्धताच बहुतांशीवेळा अधोगतीला कारणीभूत ठरतात. म्हणूनच नवीन वर्षाच्या शुभेच्छा  'या' अशुद्धतेवर मात करण्यासाठी. एका वर्षात सगळ्यांवरती मात करणं शक्य नाही, तरीपण त्या दिशेनं टाकलेलं एक पाऊलही मह्त्वाचंच. म्हणूनच २०१८ साठी - 'अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे' याच शुभेच्छा. या शुद्धतेमध्ये माणुसकीचा नंबर सगळ्यात वरचा म्हणून एक सदिच्छा - 'हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे'. हॅप्पी न्यू ईयर !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

आईचा साठावा वाढदिवस

देखणी ती जीवने - महाराष्ट्रदिन विशेष