बाईमाणूस

बाईमाणूस, ८ मार्च २०१८, जागतिक महिला दिन
- केदार क्षीरसागर

विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांपासून (१९०० ते १९२०) अमेरिका, रशिया, जर्मनी, इंग्लंड आदी देशांमध्ये स्त्रियांनी एकत्र येऊन आपल्या मूलभूत हक्कांविषयीच्या मागण्या मांडायला सुरुवात केली होती. ८ मार्च १९१७ रोजी रशियातल्या वस्त्रोद्योग कामगार असलेल्या महिलांनी 'अन्न व शांतता' या विषयांशी संबंधित मागण्यांसाठी मोर्चा काढला आणि या अभूतपूर्व मोर्चातून रशियन क्रांतीची बीजं रोवली गेली. तेव्हापासून स्त्रियांच्या हक्कांच्या जागरूकतेसाठी ८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून पाळला जातो. आपल्या ओळखीतल्या किंवा घरातल्याच एखाद्या मुलीने महिला दिन का साजरा करतात ? असा प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर देता येईल का ? ते देता येण्यासाठी - स्त्री हक्क म्हणजे काय ? ते कसे मिळाले ? स्त्री चळवळीचा इतिहास काय ? हे माहिती असलं पाहिजे.  मुळात समाजातल्या संख्येने निम्म्या असलेल्या एका वर्गाचा असा दिन पाळला जातो हेच एक वेगळेपण आहे. स्त्री-वर्ग गुणवैशिष्टयांनी वेगळा आहेच पण स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळण्याची कथासुद्धा वेगळीच आहे. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात स्त्रियांना मूलभूत हक्कांसाठी लढे द्यायला लागले आहेत. शिक्षण असो वा आरोग्य, घटस्फोट असो वा गर्भपात किंवा वारसाहक्क, व्यवस्थेने हे हक्क सहजपणे स्त्रियांच्या पदरात टाकले नाहीत. आज आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या स्त्रियांना मिळालेले हक्क, स्वातंत्र्य हे इतिहासामध्ये  कुणीतरी त्यासाठी लढा दिला म्हणून मिळालेले आहे. उदाहरणच द्यायचं तर बंद झालेली सती जाण्याची पद्धत, केशवपनाची रूढी आणि स्त्री-शिक्षणाचे उघडले गेलेले दरवाजे, ही सगळी स्त्री हक्कांसाठी लढल्या गेलेल्या चळवळीची फलितं आहेत. शतकानुशतके बंद दाराआड परदास्यामध्ये अडकलेल्या स्त्रियांची आणि अजूनही शिल्लक असलेल्या स्त्रीवर्गाच्या समस्यांची आठवण करून देण्यासाठी महिला दिन साजरा केला पाहिजे. स्त्री समस्या संपल्या आहेत असं कुणाला वाटत असेल तर अजूनही मुलीच्या आई-वडिलांना मुलगी घरी येईपर्यंत काळजी का वाटते ? याचा विचार करायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्री वर्ग म्हणजे फक्त शहरातला वर्ग नाही आहे. अजूनही डोक्यावर गवताचा भारा वाहणारा स्त्री वर्ग खेड्यापाड्यातून आणि आदिवासी भागांतून शिल्लक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. खालच्या पायरीवरच्या स्त्रियांच्या समस्या वेगळया आणि जास्त गंभीर आहेत. या अशा वेगळ्या नजरेने पाहिलं तर स्त्री-दिनाचं औचित्य लक्षात येईल.

काही दिवसांपूर्वी राजहंस प्रकाशनाचं करुणा गोखलेंनी लिहिलेलं 'बाईमाणूस' हे पुस्तक वाचनात आलं आणि स्त्री-मुक्ती चळवळीविषयी खूप माहिती आणि वेगळी दृष्टी मिळाली. पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे - कुसुमाग्रज एका कवितेत 'समान मानव माना स्त्रीला' असं म्हणतात, वास्तवात 'किमान मानव माना स्त्रीला' अशीच विनवणी बऱ्याच ठिकाणी करायला लागते. ही विनवणी म्हणजे स्त्री-मुक्तीवाद. या 'वादाला' तर्कनिष्ठपणे आणि सूज्ञपणे समजून घेण्यासाठी पुस्तकच वाचलं पाहिजे. पण हा लेख पुस्तकाच्या थोडक्यात परिचयासाठी. पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखिका स्त्रीवरती लादलं गेलेलं दुय्यमत्व मान्य करायला सांगते, कारण त्यानंतरच त्या दुय्यमत्व निवारणाची चळवळ समजून घेता येते. स्त्रीमुक्तिवादाला समर्थक कमी आणि शत्रू जास्ती असल्याने हा वाद चेष्टेच्या कचाट्यात पण सापडला आहे, त्या कचाट्यातून त्याला मुक्त करणे हादेखील पुस्तकाचा उद्देश आहे. प्रस्तुत लेखातील पुढच्या भागात आलेली अनेक वाक्यं पुस्तकातलीच आहेत किंवा पुस्तकातील मतांच्या, प्रतिपादनाच्या संदर्भाने ती वाक्यं लिहिलेली आहेत.

लेखिका सांगते - स्त्री-मुक्तीवाद हा साचेबंद नाही आणि त्याला एकच एक अशी व्याख्या नाही. हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीप्रमाणे स्त्री-मुक्तीवाद विविधांगी आहे. ज्या टप्प्यावर जी स्त्री उभी आहे, तिथून प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावर जाणे हा त्या स्त्रीसाठी मुक्तीवाद आहे. जगाच्या एका कोपऱ्यात स्त्रीला रोज ताजं अन्न खायला मिळणं हा मुक्तीवाद आहे तर दुसऱ्या कोपऱ्यात कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळणे हा मुक्तीवाद आहे. म्हणूनच स्त्री-मुक्तिवादाचा Scope खूप मोठा आहे. एकीकडे स्त्री-वैशिष्ट्यांचा (मातृत्व, संगोपन, कुटुंब-वत्सलता इत्यादी) अभिमान हे या वादाचं फलित आहे तर दुसरीकडे याच वैशिष्ट्यांपासून मुक्ती हे देखील या चळवळीचं फलित आहे. महिला चळवळींनी चार सत्तांना आव्हान दिलं आहे - राजसत्ता, अर्थसत्ता, ज्ञानसत्ता आणि धर्मसत्ता. या चारही सत्तांनी वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रियांना धाकात ठेवलं होतं. धर्माने स्त्रीदेहालाच दुय्यमत्त्व दिलं, ज्ञानसत्तेनं शिक्षण द्यायचं नाकारलं, अर्थसत्तेशी दूरदूरपर्यंत स्त्रियांचा संबंधच आला नव्हता आणि राजसत्तेने स्वतःहून या जाचातून स्त्रीची मुक्तता करण्याचे कधीही प्रयत्न केले नाहीत. म्हणूनच वेगवेगळ्या देशांत महिला चळवळींना प्रारंभ झाला. या चळवळींचा सुरुवातीचा लढा शिक्षणासाठी होता, नंतर तो अर्थार्जनासाठी होता आणि आता हा लढा बरोबरीचे स्थान मिळवण्यासाठीचा आहे. अनेक ठिकाणी या लढायांना यश येत गेलं. भारताचाच विचार करता आज उच्च आणि मध्यमवर्गातली स्त्री शिक्षण घेऊन प्रगती करत आहे, अर्थार्जन करून कुटुंब सांभाळत आहे, हे स्त्रीमुक्तीवादाचंच यश आहे. 'आता तरी उजाडेल' असं म्हणत या चळवळी अनेक संस्था, संघटनांच्या माध्यमातून सुरु आहेत. मागच्याच वर्षी झालेला महाराष्ट्रातील मंदिर प्रवेशाचा लढा या चळवळीतला पुढचा टप्पा होता. तीन तलाक पद्धतीवर आणली गेलेली बंदी ही देखील या चळवळीसाठी महत्वाची घटना आहे.

चळवळीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर स्त्रियांना जगण्यासाठी पर्यायी जीवनपद्धती कोणती ? तर पुरुषासारखी जीवनपद्धती, अशीच समज होती. पुरुषासारखं वागणं म्हणजे मुक्ती, पुरुषासारखं वागणं म्हणजेच यशस्वी होणं असं या चळवळीला वाटत होतं. पण कालांतराने आक्रमकता, सत्तास्पर्धा, कट-कारस्थानं आदी पुरुषी गुणांनी समाजात माजलेला कलह पाहून स्त्री-मुक्ती चळवळीने यु-टर्न घेतला आणि सहकार, समन्वय आदी गुणांचा स्वीकार आणि प्रसार करायला सुरुवात केली. प्रसिद्ध लेखक शिवराज गोर्ले त्यांच्या एका पुस्तकात म्हणतात - काही स्त्री-सुलभ गुण पुरुषांमध्ये रुजवणे हे निकोप सामाजिक वातावरणासाठी आवश्यक आहे. चळवळीचं देखील आज हेच म्हणणं आहे. पुरुष-अनुकरणाबरोबरच 'पुरुषद्वेष्टे' असल्याचा आरोप चळवळीवरती झाला. काही अंशी तो खराच होता. पण अनेक वर्षांच्या घोर घुसमटी नंतर असा द्वेष महिलांच्या मनात उत्पन्न होणं साहजिक होतं. (आज जर केशवपनाची पद्धत कुणा मुलीला किंवा मुलाला देखील सांगितली तर त्यांच्या मनात ही पद्धत लादणाऱ्यांच्याविषयी द्वेष निर्माण होऊ शकतो. आजही लग्नासाठी स्थळ शोधताना - मुलीला 'दाखवायला' नेणे किंवा सासरचे गाव विचारताना - कोणत्या गावाला 'दिली', असे शब्दप्रयोग वापरले जातात. ते ऐकून मुलींना चीड निर्माण होणे साहजिक आहे.) मात्र कालांतराने पुरुषांचा द्वेष करून काही हाती लागत नाही हे समजल्यावर चळवळीने आपली चूक सुधारली आणि चळवळ अभ्यासाच्या मार्गाने पुढे जाऊ लागली. अभ्यासाच्या क्षेत्रात चळवळीने विविध सामाजिक समस्यांचा अभ्यास केला. स्त्रियांचे अर्थशास्त्र, स्त्री देहाचा व्यापार, कुटुंबांतर्गत हिंसा, व्यापार, परराष्ट्र धोरणे, पर्यावरण, सत्ताकारण असे सर्वच विषय चळवळीने हातात घेतले आणि आपली मते ठामपणे मांडली. भारतात २००५ साली झालेला स्त्री संरक्षण आणि कुटुंबांतर्गत हिंसा विरोधी कायदा हा चळवळीच्या अभ्यास आणि दबाव यांमुळेच तयार झाला. असाच कायदेविषयक बदल स्त्रियांना गावपातळीवरील राजकारणात आरक्षण देण्याविषयी झाला.

स्त्री-मुक्तीवादी चळवळीच्या यशाने पोटशूळ उठलेल्या लोकांनी चळवळीच्या बाहेरील महिलांकडूनच चळवळीला बदनाम करण्याचे प्रयत्न केले. कुटुंबविरोधी आणि मातृत्वविरोधी असल्याचा आरोप चळवळीवरती झाला. कोणत्याही शहाण्या माणसाला चळवळीचे म्हणणे ऐकून घेतले तर हे समजेल की चळवळीचा विरोध कुटुंबाला नव्हे तर कुटुंबामध्ये स्त्रीला दिल्या गेलेल्या दुय्यमत्वाला होता, स्त्रीच्या दाबल्या गेलेल्या आवाजाला होता/आहे. कुटुंबांतर्गत स्त्रीला सुरक्षित वाटतं हे जरी खरं असलं तरी घरामध्येच होणाऱ्या मुस्कटदाबीला चळवळीने विरोध केला. स्त्रीसाठी मातृत्व सुखावणारे आहेच, पण ते स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार स्त्रीलाच असला पाहिजे असं चळवळीतल्या लोकांना ठामपणे वाटतं. मातृत्व पेलण्यासाठी शिक्षण आणि ते निभावण्यासाठी अर्थार्जनही तितकेच आवश्यक आहे असं चळवळीचं म्हणणं आहे. कितीही आरोप झाले तरी चळवळ मागे हटली नाही, पुढेच जात राहिली. कुटुंब आणि मातृत्वासॊबत आज अनेक स्त्रिया शिक्षण घेत आहेत, अर्थार्जन करत आहेत.  ( आजही काही व्यक्ती, संघटना स्वतः ब्रह्मचारी असूनही हिंदू महिलांना जास्ती मुलांना जन्म देण्याचं आवाहन करतात, कोणत्याही सूज्ञ माणसाला याविषयी चीड येऊ शकते/ यायलाच हवी).

विषयप्रवेश या विभागांतर्गत लेखिका चळवळीचे, स्त्री मुक्तिवादाचे वरती लिहिल्याप्रमाणे वेगवेगळे आयाम उलगडून दाखवते. त्यासोबतच लेखिका एक खंत व्यक्त करते की स्त्री-पुरुष समानतेचा ध्यास घेऊन कोणी चळवळ चालवली म्हणून आज आपण सुखाने जगतो आहोत याचा आजकालच्या बहुतांश स्त्रियांना पत्ताच नसतो. यातील काहीजणींचं 'मी स्त्री-मुक्तीवादी नाही' असं म्हणणं असतं. चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी हे वेदनादायी असतं. विषयप्रवेशाच्या शेवटी लेखिका म्हणते - स्त्रीवादाचे वैर सत्ता-असमतोल, विषमता, शोषण, खच्चीकरण, हिंसा याच्याशी आहे. लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री केवळ पुरुषांसाठी नसून स्त्रियांकरितापण ती लागू होते हे भान ज्यादिवशी समाजाला येईल, त्यादिवशी स्त्रीमुक्तीवादाचे प्रयोजन संपेल.

पुस्तकाच्या पुढच्या भागांमध्ये स्त्री-देह, कुटुंबसंस्था, स्त्री-शिक्षण, प्रसारमाध्यमे, अश्लील साहित्य, राजकारण, समलिंगी संबंध, कायदा आदी विषयांना धरून लेखिकेने स्त्री-मुक्तिवादाची मांडणी केली आहे. वरील सर्व विषयांमध्ये समस्या आहेतच. स्त्री-देहाला चिकटलेला अशुद्धतेचा शाप, कुटुंबसंस्थेतला जाच-दडपण, अजूनही खेडोपाडी शिल्लकअसलेला शिक्षणातला भेदभाव, प्रसारमाध्यमांत रंगवली जाणारी खलनायक स्त्री, राजकारणातलं स्त्रीचं नामधारी असणं, बलात्कारासारख्या गंभीर घटनांच्या चौकशीचे नियम आणि पद्धती आजदेखील पाळल्या न जाणं, हे आणि असे बरेच प्रश्न स्त्रीवादाला हाताळायचे आहेत. लेखिकेने या सर्व विषयांवरती  अत्यंत विस्तारपूर्वक आणि अभ्यासू मांडणी केली आहे. या लेखाच्या मर्यादेत ही सगळी मांडणी थोडक्यातदेखील मांडणे अवघड आहे.

बहुतांची अंतरे या विभागात लेखिकेने वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्री-पुरुषांची स्त्री-मुक्तीविषयीची मतं संपादित केली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या स्त्री चळवळीत ज्यांचं मोठं योगदान राहिलं आहे अशा विद्याताई बाळ यांनी सांगितलेला एक प्रसंग अत्यंत बोलका आहे. काही वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेकडे पैशांची अडचण असल्याने जहाल नेत्यांनी मुलांच्या शाळांचे काय ते आधी बघा, मुलींच्या शाळांचे नंतर बघू अशी सूचना केली. साहित्यसम्राट न. चिं. केळकरांनीदेखील या सूचनेला पाठिंबा दर्शवला. पण केळकरांच्या मुलीने - कमलाबाई देशपांडे यांनी जाहीरपणे आपल्या वडिलांच्या विरोधात भूमिका घेतली. यालाच बंडखोरी म्हणतात. 'समान मानव माना स्त्रीला' असं म्हणतात ते हेच. या घटनेनंतर पुण्यामध्ये - 'बघा स्त्री शिक्षणाचे दुष्परिणाम' असा अपप्रचार देखील सुरु झाला होता.

आमच्या घरात सगळं  समानच असतं, आम्हाला काय या स्त्रीमुक्तीची गरज असं कोणाला वाटू शकतं. तुमचं घर या समस्यांना अपवाद असेल तर आनंद आहे, पण याचा अर्थ तुमच्या शेजारच्या घरी अशी काही समस्या नसेलच असं नाही. अजूनही बहुसंख्य भारत खेड्यापाड्यांत राहतो, तिथं या समस्या असू शकतात, शहरातही बंद दरवाज्याआड चकाचक घरांमध्ये या समस्या असतील. या सामाजिक समस्या नाकारण्यात काय हशील आहे ? स्त्रीला स्त्रीच्या भूमिकेतून आणि पुरुषाला पुरुषाच्या भूमिकेतून बाहेर काढून दोघांनाही माणूसपण मिळण्यात सर्वांचं सुख सामावलेलं आहे. या माणूसपणाकडे जाण्याच्या वाटचालीत स्त्री-मुक्ती चळवळीचे मोठे योगदान आणि मार्गदर्शन असणार आहे. ती चळवळ, ती धडपड समजण्यासाठी वाचायला हवे - बाईमाणूस.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

आईचा साठावा वाढदिवस

देखणी ती जीवने - महाराष्ट्रदिन विशेष