आईचा साठावा वाढदिवस

            लहानपणी शाळेमध्ये कधीतरी आपण 'माझी आई' असा निबंध लिहिलेला असतो. आपण मोठे होत जात असतो तसे निबंधांचे विषय बदलत जातात आणि पुन्हा कधी 'माझी आई' निबंध लिहायची वेळच येत नाही. लहानपणी खाऊ-पिऊ घालणारी, शाळेत पाठवणारी एवढीच आई आपल्याला कळलेली असते. त्यानंतर आपण मोठे होऊ तसे आई या नात्याचे अनेक पदर आपल्याला उलगडत जातात, आपल्याला आपली आई थोडी जास्ती कळू लागते, पण मदर्स डे किंवा आईच्या वाढदिवसाची पार्टी एवढ्यापुरतेच आपण व्यक्त होतो आई विषयी, ते पण खूप वरवरचे. आज म्हटलं पुन्हा एकदा 'आई' या विषयावर निबंध लिहायला आपण बसलो तर !
            खरंतर आई 'आई होण्याआधी' मुलगी असते कुणाची तरी. आपल्या बहिणीसारखी तिच्या बाबांची लाडकी. आपण ती मुलगी असलेली आई पाहू शकत नाही पण आपल्या बहिणीसारखीच अवखळ, मैत्रिणींमध्ये रमणारी, शाळेत जाणारी, दंगामस्ती करणारी तरीही आजी-आजोबांच्या शिस्तीत, संस्कारात ती वाढलेली असते. विशी-पंचविशीत आल्यावर ती आजी-आजोबांचे घर सोडून बाबांच्या घरी येते त्यांची बायको म्हणून. केवढा मोठा बदल तिने स्वीकारलेला असतो आपल्यासाठी आणि आपल्या बाबांसाठी. बरीचशी स्वप्नं खुंटीला टांगून, जगरहाटी म्हणून ती काही कळायच्या आत वेगळ्या जगात प्रवेश करते बिनबोभाट आणि मुकाट. संसाराचा नवा डाव खेळायला ती सज्ज होते आणि त्यापाठोपाठ 'आई' ची भूमिकाही तिच्याकडे येते. आजकालच्या स्त्रिया करतात तसं करिअर वगैरे करायचं तिला माहित नसतं. संसाराला हातभार म्हणून आईपणाच्या जबाबदारी पाठोपाठ नोकरी किंवा छोट्या-मोठ्या व्यवसायाची जबाबदारी तिच्यावर येते. घरदार, मुलं, नवरा, नोकरी, नातेवाईक, दुखणी-खुपणी, सणवार सगळी खाती सांभाळणारी होम मिनिस्टर ती होते. मुलं मोठी आणि स्वतंत्र होईपर्यंत या आईच्या खात्यावर प्रचंड ताण असतो. तो ताण पेलत 'आई' मोठी होत असते. आई होण्याचं कुठं ट्रेनिंग तिला मिळत नाही. चुकत-शिकत ती मोठी होते. ३०-३५ वर्षांच्या या संसारात आणीबाणीचे प्रसंग खूप आलेले असतात. प्रसंगी या काळामध्ये सगळ्या निर्णयांची जबाबदारी घेऊन कुटुंबाची नौका ती सहज पैलतीरावर नेते आणि काही वर्षांनंतर आई रिटायर्ड होते. आधी नोकरी, व्यवसायातून होते आणि नंतर शक्य झाल्यास संसारातून. विभक्त कुटुंब पद्धतीत मुलं वेगळी राहू लागल्यामुळे तर काही आयांची संसारातून रिटायर्डमेंट पण शक्य होत नाही आणि झालीच तिथून ती रिटायर्ड तरी आईपणातून ती कधी रिटायर्ड होते का ? कधीच नाही.
            आई नावाच्या देव्हाऱ्यात आपण आईची स्थापना केलेली असते. विठोबा-रखुमाईला कमरेवरचा हात खाली घ्यायला परवानगी नाही तशी आईला पण क्षणभर शांत बसायला उसंत नाही. एकदा का मुलांची आणि नवऱ्याची अनंतकाळची माता झाली की ती सदैव दक्ष कमरेवर हात ठेऊन, कुटुंबाच्या सगळ्या गरजांना पुरे पडण्यासाठी.  मध्येच कधीतरी तिला नैवेद्य मिळतो बाबांच्या प्रमोशनचा, आपल्या शाळा-कॉलेजातल्या बक्षिसाचा. तिचं पोट भरतं तेवढयाने, पण म्हणून ती थांबत नाही. तुम्ही दहावी पास झालात की तिला बारावीची चिंता सुरु होते, बारावी व्हायच्या आधीच पुढच्या प्रवेशाची, कॉलेज संपायच्या आधीच तुमच्या नोकरीची, नोकरी मिळाली की ठिकाणच्या तुमच्या राहण्याची, तिथे तुम्ही स्थिर झालात की तुमच्या आयुष्यभराच्या जोडीदाराची आणि बरंच काही. तिच्या मनात चाललेले खेळ आणि विचार यांचा तुम्हाला सहजी थांग लागूच शकत नाही. ती तुमच्या इतकी गुंतलेली असते की तुमच्यापुढे तिला कधी काही महत्वाचं वाटतच नाही. आपल्या आयांची पिढी अगदीच घरात राहिलेली नाही. नोकरीच्या निमित्तानं तिनं घराबाहेरचं जग बघितलंय पण ती बाहेर गेली तरी तिचं इथेच कुठेतरी असतं तुमच्या जवळपास. आपण मोठे होत जातो, आपल्या भूमिका बदलतात पण आईची भूमिका तीच राहते. आपण 'एवढी काय काळजी करायचीये त्यात' असं सहज म्हणून जातो. पण 'काळजाचा तुकडा' कसा सांभाळायचा असतो ते तिलाच माहिती असतं. आपल्या आवडीची वस्तू जरा कुठे सापडली नाही तर अस्वस्थ होणारे आपण आईच्या काळजाचा तुकडा असतो, काय काय दिव्यातून तिने तो तिच्यासाठी मौल्यवान असलेला तुकडा सांभाळेला असतो आपल्याला थोडीच माहिती असतं. तुम्हाला बरं नसताना अस्वस्थ झालेली, तुमचा महत्वाचा पेपर सुरु असताना काळजी करणारी, तुमच्या नोकरीच्या पहिल्यादिवशी देवापुढे निरांजन लावणारी, तुम्ही प्रवासाला गेला असाल तर मिनिटामिनिटाला फोनकडे पाहणारी, जन्माच्या वेळेला नाळ तुटली तरी तुमच्याशी तितक्याच घट्टपणे जोडली गेलेली आई आपण पाहिलेलीच नसते. आई म्हणून तिला वापरताना कधीकधी तिला 'माणूस' म्हणून जगता येत नाही याची खंत वाटते. तुमच्यासाठी तिनं केलेल्या त्यागाची जाणीव झाली तर कधी अपराधी पण वाटते. आईला देवानं जन्माला घातलं असं आपल्याकडे म्हणतात पण मग त्याला आईपणाच्या देव्हाऱ्यातून सुटका करण्यासाठी काहीच नाही का करता आलं असं उगाचच मनात येतं. आपल्याकडच्या 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' च्या प्रकारात आणि तरीही पुरुषप्रधानतेच्या संस्कृतीत कुठंतरी स्त्रीत्व आणि आईपण तिला बंधनात अडकवत तर नाही ना असा विचार मनात येऊन जातो. असो. तरीही आपण मोठे होऊ तसं समजूतदारपणाचं आणि जबाबदार झाल्याचं गिफ्ट तिला देऊ शकतो. तिच्या आईपणाला पुरणार नाही, पण तिला थोडं सुखावणारं 'शहाणा मुलगा/मुलगी 'पण  आपण स्वीकारू शकतो. विठ्ठलाला, संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांना, एवढंच नव्हे तर वारीमध्ये निरपेक्ष भावनेनं भेटणाऱ्या प्रत्येकाला माउली म्हणतात. जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये लिहिल्या गेलेल्या कवितांची वर्गवारी केली तर, आई विषयावरच्या कविता सर्वात जास्त सापडतील. म्हणूनच तर मातृत्व हे चराचराला व्यापून राहिलं आहे असं म्हणता येईल, अगदी सर्व प्राणिमात्रांमध्ये.
            आज आईचा साठावा वाढदिवस म्हणून खरंतरं हे सगळं मनात आलं. आईला वाढदिवसादिवशी काय गिफ्ट द्यायचं असा विचार मनात आला आणि थोडं हसायला आलं. जिने आपल्याला जग दाखवून सगळ्यात मोठं गिफ्ट आपल्याला दिलंय तिला काय रिटर्न गिफ्ट देणार आपण. नाना पाटेकर आपल्या आईला मारतो तशी गळामिठी हेच मोठं रिटर्न गिफ्ट, आपलं बाळ अजून आपल्यासोबत आहे याचा आभाळभर आनंद देणारं. ज्या हातांनी आपल्या बाळाचा पाळणा जोजवला त्या हातांना हे मोठं झालेलं बाळ आज हातात घेतंय आणि त्या स्पर्शामध्ये तीच ऊब आहे जी लहानपणी होती त्याच्या सोबतीमध्ये असा उबदार विश्वास देणारं रिटर्न गिफ्ट. ज्या आईनं आचार-विचारांचं स्वातंत्र्य दिलं, वेगळा विचार करण्याचं, मांडण्याचं बळ दिलं, प्रामाणिकपणा आणि इतरांबद्दलची संवेदना जिने शिकवली, सत्य आणि सुंदर यांचा ध्यास घ्यायला शिकवलं, शब्दांमधलं सौंदर्य आणि सूरताल यांच्यातलं माधुर्य जिने दाखवून दिलं, प्रयत्नांवरची - कामावरची निष्ठा, कोणतंही काम करताना लाज न बाळगण्याचं धैर्य आणि सभोवतालच्या माणसांमधून चांगलं तेवढं शिकण्याचं बाळकडू जिने दिलं तिच्या आयुष्यातला आजचा आनंदाचा दिवस. माझ्या या वाङ्मयीन शुभेच्छांनी आणखी आनंदी होईल यात शंकाच नाही.

शेवटी मी जे एवढ्या शब्दात सांगितलं ते गदिमांच्या चार कडव्यांच्या कवितेतून:                
दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस, जिण्यालागी आकार माझ्या दिलास, तुझ्या वंदितो माउली पाउलांस !
गुरु आद्य तू माझिया जीवनात, तुवा पेरिली धर्मबीजे मनात, प्रपंचात सत्पंथ तू दाविलास, तुझ्या वंदितो माउली पाउलांस !
तुझा कीर्ती विस्तार माझा प्रपंच, कृपेने तुझ्या रंगला रंगमंच, वठे भूमिका पाठ जैसा दिलास, तुझ्या वंदितो माउली पाउलांस !
उमेचे, रमेचे, जसे शारदेचे, जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या वंदितो माउली पाउलांस !

कवी यशवंतांच्या पण चार ओळी आठवतायत -
आई तुझ्याच ठायी सामर्थ्य नंदिनीचे,
माहेर मंगलाचे, अद्वैत तापसांचे,
गांभीर्य सागराचे, औदार्य या धरेचे,
नेत्रात तेज नाचे त्या शांत चंद्रिकेचे,
वात्सल्य गाढ पोटी त्या मेघमंडळाचे,
वास्तव्य या गुणांचे आई तुझ्यात साचे !

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

देखणी ती जीवने - महाराष्ट्रदिन विशेष