पुस्तक परिचय - पुतीन (महासत्तेच्या इतिहासाचे अस्वथ वर्तमान), गिरीश कुबेर, राजहंस प्रकाशन

कोणताही बुरखा न घातलेली हुकूमशाही समजून घ्यायची असेल तर हिटलरचा इतिहास जाणून घ्यायला हवा आणि लोकशाहीचा, लोककल्याणाचा बुरखा/मुखवटा घातलेली हुकूमशाही पाहायची असेल तर रशियाचा अस्वस्थ वर्तमान अभ्यासायला हवा. अस्वस्थतेला 'अस्वस्थ' म्हणण्याची देखील सोय नसलेला, व्यक्तिकेंद्रित हुकूमशाहीच्या बळी पडलेला आजचा रशिया आहे. या रशियाची आणि या हुकूमशाही व्यक्तिमत्वाची ओळख मराठीतून करून देणारं पुस्तक आता उपलब्ध झालंय. राजहंस प्रकाशन प्रकशित आणि गिरीश कुबेर लिखित - पुतिन (महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान). लोकसत्ताच्या २०१६ च्या दिवाळी अंकातून या पुस्तकाची चाहूल लागली होती आणि मे २०१७ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.

गिरीश कुबेर सरांची ओळख लोकसत्ताचे संपादक इतकीच नसून तेलाच्या राजकारणावरील दोन पुस्तके, त्याच बरोबर अधर्मयुध्द, युद्ध जीवांचे, तसेच टाटा उद्योगसमूहाची कहाणी सांगणारे टाटायन, अशा पुस्तक रूपाने ते साहित्यिक देखील झाले आहेत. आणि आता वेगळ्याच विषयावरचे हे पुस्तक - पुतिन. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तसेच अर्थशास्त्र आणि औद्योगिकीकरण यांचा अभ्यास आणि त्या जोडीला कोणताही विषय गोष्टीस्वरूप मांडण्याची हातोटी, हे कुबेर सरांचे strong points. यांमुळेच हे पुस्तक वाचनीय झाले आहे. परंतु रोजच्या लोकसत्तात चुरचुरीत आणि खरमरीत अग्रलेख लिहिणारे कुबेर सर पुस्तकात अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे कुबेरप्रेमींनी 'त्या' अर्थाने हे पुस्तक हातात घेतलं तर त्यांना त्यात काही सापडणार नाही. पत्रकार आणि साहित्यिक यांच्यातली सीमारेषा कुबेर सरांनी अगदी योग्य पद्धतीने पाळली आहे. भारतातल्या वर्तमानावर रशियाच्या वर्तमानातून भाष्य करण्याचा मोह या पुस्तकात आवरता घेतलेला आहे किंवा असे कोणतेही भाष्य पुस्तकात नाहीच आहे. कदाचित रशियाचा वर्तमान समजून घेऊन त्याचा भारताशी आणि भारतीय राजकारणाशी संदर्भ जोडण्याची जबाबदारी कुबेर सरांनी त्यांच्या सूज्ञ वाचकांवर टाकलेली आहे.

भारतातल्या अ-व्यवस्थेवर उपाय म्हणून 'भारतात हुकूमशाही असली पाहिजे' अशी उबळ अनेक भारतीयांना येत असते. कारण त्यांनी हुकूमशाही अनुभवलेली अभ्यासलेली नसते. हुकूमशाहाला न आवडणाऱ्या लोकांची गॅस चेंबर मध्ये कोंबून हत्या करणे, हुकूमशाहीच्या भ्रष्टाचाराबाबत कोणी ब्र देखील काढला तरी त्याला आयुष्यातून उठवणे, असली टोकाची हुकूमशाही भारतात आली तर काय होईल ? याचा विचार या लोकांनी केलेला नसतो. हुकूमशाही फक्त राजकारणात असते असं नाही. भारतातल्या बहुसंख्य घरांमधून पुरुषी हुकूमशाही आज देखील नांदत आहे. तेव्हा या घरातील स्त्रिया आणि मुले यांची मुस्कटदाबी आणि घुसमट जरी पाहिली तरी हुकूमशाही म्हणजे काय याची कल्पना येऊ शकते. प्रत्येकाचे जीवन सुंदर असते आणि ते सुंदर जीवन कुरूप करण्याचा अधिकार दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला नसतो. पण हुकूमशहा तर एकाच वेळी अनेकांचे आयुष्य कुरुपतेकडे नेत असतो. आणि वरती काही हुकूमशहा जनतेवरती उपकार केल्याचा बुरखा पांघरतात तो वेगळाच - ढोंगीपणा. असो तर प्रस्तुत पुस्तकामध्ये रशियातल्या अनेक बुद्धिवाद्यांचे जीवन उध्वस्त करणाऱ्या, विरोधकांची गळचेपी करणाऱ्या हुकूमशाहीचं दर्शन आपल्याला घडते.

कुबेर सर पुस्तकाची सुरुवात करतात ती प्राचीन रशियाच्या सत्ताकरणापासून. जुन्या काळामध्ये कोणकोणत्या राजसत्तांची रशियावर सत्ता होती याचं धावतं वर्णन पहिल्या प्रकरणामध्ये केलेलं आहे.नंतरचं प्रकरण आहे ते रशिया ज्यांच्या नावाने आजही ओळखला जातो त्या लेनिन आणि स्टालिन यांच्यावरती.  १९५३ च्या स्टालिनच्या गूढ मृत्यूनंतर सुरु होतं ते निकिता ख्रुश्चेव्ह प्रकरण. इथून पुढे लेखक रशियाचा इतिहास विस्ताराने मांडतो. ख्रुश्चेव्ह यांच्या नंतर पर्व येतं लिओनिद ब्रेझनेव्ह यांचं. त्यानंतर मिखाईल गोर्बाचेव्ह आणि नंतर बोरिस येल्त्सिन. राजकारणाच्या अंगाने पाहिलं तर - ज्याने आपल्याला राजकारणात आणलं, प्रस्थापित केलं, त्याच्या विरोधात उठाव करून त्याला घरी घालवून सत्ता बळकवायची. नंतर त्यालाच नजरकैद करून त्याला हुकूमशहा ठरवायचं, त्याचं राजकारण कसं वाईट होतं हे सांगत फिरायचं, हाच रशियाचा इतिहास. त्यामुळे रशियात खऱ्या अर्थाने थोड्या काळासाठी देखील लोकशाही नांदलीच नाही. तिथं सत्ता होती ती - 'मी म्हणेन ती पूर्व दिशा' असं मानणाऱ्या एककल्ली, स्वतःवर प्रेम करणाऱ्या सत्ताधीशांचीच. येल्त्सिन यांनी गोर्बाचेव्ह यांच्याकरवी रशियाचं विभाजन करून घेतलं आणि याचं येल्त्सिन यांचं बोट धरून पुतीन आधी पंतप्रधान आणि नंतर राष्ट्रपती झाले. १९९९ साली पुतीन यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु झाली असली तरी पुस्तकामध्ये लहानपणापासूनच्या पुतीन यांचा इतिहास वाचायला मिळतो. त्यांची गुप्तहेर खात्यातली नोकरी, नंतर वेगवेगळ्या सरकारी पदांवर झालेली नेमणूक, येल्त्सिन यांच्याशी वाढत गेलेली जवळीक आणि आपला माणूस म्हणून येल्त्सिन यांनी पुतीन यांचा केलेला राज्याभिषेक, हा इतिहास वाचून झाला की नंतर पुस्तकामध्ये दाखवून दिले आहेत पुतीन यांचे वेगवेगळे रंग आणि ढंग.

पुतीन यांनी सुरुवात केली तीच मुळात खोट्या दहशतवादी चकमकी घडवून आणि मग या दहशहतवाद्यांचा निपटारा करणारे पुतीन अशी स्वतःची प्रतिमा उभी करत निवडणूका जिंकायला सुरुवात केली. पुतीन यांची अख्खी कारकीर्द म्हणजे वाटेत येणाऱ्या प्रत्येक माणसाला चिरडून टाकण्याची. पुतीन यांनी सगळ्यात मोठं आयुष्य उध्वस्त केलं ते उद्योगपती बेरेझोव्हस्की यांचं. ज्या उद्योगपतींनं पुतीन आणि येल्त्सिन यांची ओळख घडवून दिली आणि जो पुतीन यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला, त्यालाच उध्वस्त केलं पुतीन यांनी. उध्वस्त करण्याचं टोक म्हणजे या उद्योगपतींच्या  दोन पत्नींना पुतीन यांनी घटस्फोट घ्यायला लावला. हुकूमशाहीचीच ही एक झलक. सेंटपिटर्सबर्ग चे महापौर सोबचक (पुतीन याच ठिकाणी उपमहापौर होते) आणि पुतीन यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या राजकारणी मरिना सेल यांचे देखील गूढ मृत्यू झाले आणि पुतीन यांच्या सत्तेने त्याची साधी चौकशी देखील होऊ दिली नाही. प्रसिद्ध बुद्धिबळपटू गॅरी कोस्पोराव्ह देखील पुतीन यांच्या दहशतीविरोधात काही काळ उभा राहिला, त्याचा देखील काटा काढला गेला - अगदी भर रस्त्यात मारहाण करून, नंतर त्याने राजकारणाचा नादच सोडला आणि नंतर देश सोडला. हे पुस्तक गिरीश कुबेर सरांनी ज्या महिला पत्रकाराला अर्पण केलं आहे ती - Anna Politkovskaya. मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या या पत्रकार. चेचन्या प्रांतातल्या पुतीन पुरस्कृत अत्याचाराचं वर्णन त्या आपल्या लेखनातून करत होत्या. पुतीन यांना हे कदापिही सहन होणार नव्हतं. २००४ साली चहातून त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला, पण त्या वाचल्या. ७ ऑक्टोबर २००६ रोजी त्यांची त्यांच्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येचा तोंडदेखला तपास तेवढा झाला. हुकूमशाहीत पहिली मुस्कटदाबी होते ती सत्य जगासमोर मांडणाऱ्या पत्रकारितेची, ती रशियामध्ये अशी झाली. पुढची दोन आयुष्य उध्वस्त झाली ती - रशियाचे तेलसम्राट मिखाईल खोदोकोर्व्हस्की आणि हेरगिरी करणारा अलेक्झांडर लिटवेन्को.

एका बाजूला वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला चिरडत पुढे जात असताना निवडणुका जिंकण्याचं कसब पुतीन यांनी शिकलं होतं. कसब कसलं तिथे देखील दडपशाहीच. उदाहरणार्थ प्रचारसभा घ्यायची असल्यास त्याला कमीत कमी ५०० लोक यायला हवेत, या ५०० लोकांची नाव-गाव-पत्ता अशी मी नोंदणी झाल्यावरच सभेला परवानगी. नोंदणी देखील प्रशासन सांगेल तशी आणि तेव्हा. असल्या भुक्कड दडपशाहीतून पुतीन यांनी आपले साम्राज्य उभे केले. संघराज्य व्यवस्थेत राज्य सरकारे आपल्या तालावर नाचतील याची देखील सोय त्यांनी करून ठेवली आहे. जनतेला राष्ट्रवादाचे डोस पाजून, त्या गुंगीत जनता राहील आणि आपल्या विरोधात ब्र देखील उच्चारणार नाही याचीही खातरजमा त्यांनी केली आहे. पुतीन यांची सत्तेची हाव आणि रशियाला जगात नंबर एकला पोहोचवण्याची ईर्षा अजून संपलेली नाही. अलीकडेच झालेल्या अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रशियाने आपल्या हेरगिरीद्वारे कसा हस्तक्षेप केला त्याचं वर्णन देखील पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणामध्ये आहे. रशियाच्या आसपासच्या देशांमध्ये राजकीय अस्थिरता माजवून या देशांचादेखील घास घ्यायचा कट पुतीन यांनी आखला आहे, त्यासाठी युद्धखोर पुतीन तयारच आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना ब्लॅकमेल करत पुतीन त्यांना आपल्या बाजूने कसे वळवत आहेत, हे देखील पुस्तकातून समजते. २०१८ च्या निवडणुकीत पुन्हा जिंकून येण्याची व्यवस्था पुतीन यांनी केलेलीच आहे असे सांगत पुस्तक संपते.

रशियाचा आणि आपला काय संबंध ? आपण कशाला वाचायचे हे पुस्तक असे कोणालाही सहजच वाटू शकेल ? पुस्तक हुकूमशाही समजण्यासाठी वाचायचे, मानवी हक्क - स्वातंत्र्य - मोकळे आकाश - सत्य या शब्दांचे अर्थ कळण्यासाठी वाचायचे. व्यक्तिकेंद्री राजकारण म्हणजे काय हे समजण्यासाठी वाचायचे. या राजकारणाचे तोटे काय होउ शकतात ते समजण्यासाठी वाचायचे. सत्याचा उच्चार करणारी पत्रकारिता किती महत्वाची असते हे कळण्यासाठी हे पुस्तक वाचायचे. सरकारविरोधी मत बहुमताच्या जोरावर दडपून टाकता येते पण ते मत जर खरंच लोकहिताचे असेल तर राजकारणापायी सरकार लोकहिताचा बळी तर देत नाही ना, हे सजग नागरिकाला कळायला हवे, आणि ते का कळायला हवे हे समजण्यासाठी पुस्तक वाचायचे.  'भारत हे लोकशाही राष्ट्र आहे' हे वाक्य किती महत्वाचे आहे हे समजण्यासाठी वाचायचे. या लोकशाहीला कुठेकुठे तडा जातो, तो कुणामुळे जातो हा विचार भारतीय नागरिकांच्या मनात हवा. आपली लोकशाही निश्चितच प्रगल्भ नाही. गुंडगिरी आणि पैसा या दोन गोष्टींनी आपल्या लोकशाहीला बरबाद केले आहे. तरीही एक मूल्य म्हणून लोकशाही महान आहे.

शेवटी गिरीश कुबेर सरांचेच काही शब्द -  सध्या परिस्थिती अशी, की सत्ताधाऱ्यांना काही शहाणपणाचे सांगणारे लोक नाहीत. आणि जेथे आहेत, तेथील राजकारणी कोणालाच जुमानत नाहीत. आपले बहुमत हेच सर्व समस्यांवर उत्तर, असे त्यांना वाटत असते. त्यामुळे ते अर्थव्यवस्थेशी कसेही वागतात. काहीही करतात. असे काहीही करणे म्हणजे वेगळे करणे, आणि प्रत्येक वेगळे काही म्हणजे सकारात्मक बदल असा यांचा समज. हाच प्रकार कमी-अधिक प्रमाणात अनेक देशांत सुरू आहे. एकाच वेळी इतक्यांना अशी अधोगतीची आस लागलेली असणे, हे तसे काळजी वाढवणारेच. पण अर्थातच ही काळजी विचार करणाऱ्यांना. तोच नसेल करायचा, तर कार्य सिद्धीस नेण्याची हमी देणारा आपला पारंपरिक भक्तिमार्ग आहेच. अर्थात तसे बरेच असते अशी भक्ती असणे. करतासवरता ‘तो’ आहे असे म्हणायचे, ‘त्या’च्यावर जबाबदारी टाकायची आणि आरतीच्या रांगेत आपले प्रसादाला उभे राहायचे. आणि एकदा का अशा गर्दीत घुसले की जाणीवही होत नाही- आपला मध्य सरकतो आहे याची. (मध्य सरकतो आहे, लोकरंग, १८ जून २०१७)

कुबेर सरांचं 'टाटायन' वाचून झालं की मनामध्ये समाधानाची भावना दाटून येते, इथे मात्र उलटं होतं, 'पुतीन' वाचलं की मनात येते अस्वस्थता, सत्ता गाजवण्यासाठी मानवतेच्या मूल्याला तिलांजली देणाऱ्या निलाजऱ्या इतिहासाची ओळख झाली म्हणून येणारी अस्वथता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

आईचा साठावा वाढदिवस

देखणी ती जीवने - महाराष्ट्रदिन विशेष