विज्ञानेश्वराची प्रतिष्ठापना

शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी शोध लावलेल्या 'रामन इफेक्ट' च्या निमित्ताने भारतामध्ये २८ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो. १५ फेब्रुवारी २०१७ रोजी आपल्या इस्रो या अवकाशसंशोधन संस्थेने १०४ उपग्रह एकाचवेळी अवकाशात प्रक्षेपित करून नवा विक्रम रचला. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये स्थापन केल्या गेलेल्या विज्ञान संशोधन संस्थांपैकी इस्रो ही महत्वाची संस्था. इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करून भारतीयांनी हा विक्रम साजरा केला. तरीही भारतीयांचं हे विज्ञानप्रेम म्हणजे अळवावरचं पाणीच, कारण अपवाद वगळता आपल्याकडे विज्ञानवादाला समाजमान्यता नाही. उदाहरणार्थ दहावी नंतर विज्ञान शाखा निवडताना देखील आपल्याकडे विज्ञानप्रेम कमी आणि 'Scope कशात जास्ती आहे' याचा विचार जास्त होतो. Whatsapp, Internet Banking आदी तंत्रज्ञान आपण वापरू लागलो तरी आपल्या रोजच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टीचा अभाव आणि धर्मश्रध्दांचा, पारंपारिक समजुतींचा प्रभाव जास्त. म्हणूनच आजच्या विज्ञानदिनी हा लेख - 'विज्ञानेश्वराची प्रतिष्ठापना'.

शाळेमध्ये पाचवीत असताना - 'दिवस कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे, विज्ञानाचे युग हे आले चला स्वागत सामोरे' असं एक विज्ञानगीत आम्हाला शिकवलं होतं. ते गाणं तेव्हा तोंडपाठ झालं होतं पण नक्की कुणाचं आणि कसं स्वागत करायचं ते तेव्हा कळलं नव्हतं. २००० सालच्या आधी दोन-तीन वर्षं - 'नवीन सहस्रक, नवीन शतक विज्ञानाचं असणार' असं कानावर पडायचं, तेव्हादेखील माझ्या बालबुद्धीला 'विज्ञानाचं म्हणजे कशाचं ?' हे कळायचं नाही. २००० सालानंतर आठवी, नववी, दहावी मध्ये जीव-रसायन-भौतिक आदी शास्त्रांची ओळख झाली. अकरावी-बारावीला विज्ञानशाखेमुळे ही ओळख आणखीन वाढली. तोपर्यंत विज्ञान विषयातले मार्क हेच महत्वाचे वाटायचे. नंतर मात्र वाढत्या वयाबरोबर, अभ्यासाबरोबर, वाचनाबरोबर आजूबाजूला पाहण्याचा परीघ विस्तारात गेला आणि विज्ञान म्हणजे काय हे उलगडत गेलं. सभोवताली घडणाऱ्या घटनांकडे पाहून माणूस नावाच्या प्राण्याच्या विचार करण्याच्या क्षमतेला, त्याच्या बुद्धीला जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची पुराव्यांसहित उत्तरे देणार ज्ञान म्हणजे विज्ञान, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण वापरतो त्या अनेक उपकरणांमागचा कार्यकारणभाव म्हणजे विज्ञान.

​'घरी एखादा पाहुणा यावा, आपण त्यानं आणलेला खाऊ खाऊन फस्त करावा, पण त्याने सांगितलेल्या चार शहाणपणाच्या गोष्टी बोअरिंग म्हणून उडवून लावाव्यात' अशा पद्धतीनं आपण विज्ञानाचा वापर केला, त्याचं स्वागत तर दूरच राहिलं. विज्ञानावर आधारित तंत्रज्ञान जसे की टी.व्ही., फ्रिज, कॅमेरा, प्रेशर कुकर, आधुनिक औषधोपचार आदी गोष्टी आपण सहज आपल्याशा केल्या, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाला आपण घराच्या उंबऱ्याबाहेरच ठेवलं. म्हणूनच आधुनिक उपकरणं वापरणाऱ्या असंख्य भारतीयांची दृष्टी मात्र पुराणमतवादीच राहिली आहे. 'आम्ही आपले जुन्या वळणाचे' म्हणत आपला जुनाच व्यवहार आपण सुरु ठेवला आहे. हे जर असे नसते तर रेल्वे, विमान (थोड्याच दिवसात बुलेट ट्रेन) आदींनी प्रवास करणाऱ्या लोकांनी पौर्णिमा-अमावस्येच्या शुभ-अशुभाच्या चर्चा केल्या नसत्या, आपल्या पोरांच्या परदेशवाऱ्या आणि स्मार्टनेसची वर्णनं करणाऱ्या पालकांनी ज्योतिषवाल्यांचे उंबरे झिजवले नसते, हातात स्मार्ट फोन आणि कानाला हेडफोन लावणारी तरुण पिढी बाबा-बुवांच्या आणि गर्भश्रीमंत संस्थानांच्या मालकीच्या देवळांच्या दारात दिसली नसती आणि सर्व सजीवांचा डीएनए एकाच भाषेत लिहिला आहे हे विज्ञानाने सिद्ध केले असूनही जात-धर्म-वंश-लिंग यांवर आधारित भेदभाव तीव्र झाले नसते. म्हणूनच सोयीचं तेवढं स्वीकारत आणि गैरसोयीचं-परंपरागत समजुतींना-प्रथांना धक्का देणारं दूर ठेवत आपण विज्ञानाला अर्धवटपणे स्वीकारलं हे सत्य आहे.​

स्वतंत्र भारत देश ज्या संविधानाच्या आधारे चालतो त्या संविधानाने नागरिकांच्या कर्तव्यांच्या यादीमध्ये 'वैज्ञानिक दृष्टिकोनाचा' समावेश केला आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह शास्त्रीय तर आहेच पण कायदेशीरसुद्धा आहे. आपल्याकडे 'विज्ञान जिथं संपतं तिथे अध्यात्म सुरु होतं' असा प्रचार सर्रास होत असतो, हे जर खरं असेल तर मग या अध्यात्माचा समावेश नागरिकांच्या कर्तव्यामध्ये का नाही ? आणि मुळात ज्या अध्यात्माला हजारो वर्षांचा इतिहास आहे असं सांगितलं जातं, ते अस्तित्वात असताना ४००-५०० वर्षांपूर्वी आधुनिक विज्ञानाचा जन्मच कसा झाला? त्याकाळी मनुष्याला पडणारे प्रश्न अध्यात्माने का नाहीत सुटले ? ते अध्यात्माला जर सुटले असते तर प्लेग, पोलिओ, क्षयरोग, कँसर आदी रोगांवर औषधोपचाराची गरजच पडली नसती. काळे तीळ, कणकेचे दिवे या रोग्यांना पुरेसे नव्हते का ? हार्ट अटॅक आल्यावर ऑक्सिजन सिलिंडर लागलाच नसता. डोळे मिटून ध्यानाला बसलं की स्काईप कॉल सुरु झाला असता. आपला मामा - 'चंद्र' आणि अनेकांचा शकुनी मामा - 'मंगळ' यांना भेटायला कुठल्याशा यानाची गरज पडली नसती. म्हणूनच आजच्या आयुष्यामध्ये जिथे अध्यात्म थांबतं तिथं खरंतर विज्ञान सुरु होतं. जिथे बापू-बुवा थकले तिथे डॉक्टर्स उभे राहिले. जिथे अंतर्ज्ञानातून संदेशवहन थांबलं तिथे आजचं दूरसंचार क्षेत्र उभं राहिलं. विज्ञानाच्या जोरावर असे अनेक फायदे आपल्याला होत आहेत आणि होत राहतील. संविधान सांगते म्हणून नाही तर आपल्याला उपयोगी पडते आणि आपल्या बुद्धीला पटते म्हणून विज्ञानवादी आचार, विचार, उच्चार गरजेचा आहे.

आता हा 'विज्ञानेश्वर' म्हणजे कोण ? तर वैज्ञानिक दृष्टी, एखाद्या गोष्टीमागचा, घटनेमागचा कार्यकारणभाव समजून घेणे. विश्वाच्या रचनेपासून, चंद्र-सूर्य-तारे यांच्या घडणाऱ्या घटनांपासून रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागच्या कारणांचा अर्थ लावण्याची हा नवीन पद्धत. ही पद्धत सर्वप्रथम सिद्ध झाली ती युरोपमध्ये. आकाशातील ईश्वराच्या इच्छेने चंद्र-सूर्य-तारे उगवतात-मावळतात हे ज्ञान बायबलमध्ये लिहिलेले होते आणि तीच सर्वसामान्य माणसांची युरोपमध्ये समजूत होती. विश्वाच्या मध्यभागी पृथ्वी असून सूर्य तिच्याभोवती फिरतो हे धर्मग्रंथांचे म्हणणे होते. कोपर्निकस या शास्त्रज्ञाने हे म्हणणे सर्वप्रथम खोडून काढले व पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असे सांगितले. गॅलिलिओ या दुसऱ्या शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला आणि कोपर्निकसच्या सिद्धांताला त्यामुळे पुष्टी मिळाली. आज याच सिद्धांताच्या आधारे जगभरच्या शाळांमध्ये विज्ञान शिकवले जाते. कोपर्निकस - गॅलिलिओच्या या प्रतिपादनामुळे युरोपमध्ये समाजमन ढवळून निघाले, चर्चा झडल्या. त्याकाळच्या धर्ममार्तंडांनी गॅलिलिओला तुरुंगात टाकले, त्याचा छळ केला. त्याने माफी मागितल्यावर त्याला उरलेले आयुष्य एकांतवासात आणि मौनव्रतात जगायला भाग पाडले गेले. त्यातच जगाला दुर्बीण देणारा हा शास्त्रज्ञ आंधळा झाला आणि १६४२ साली मरण पावला. धर्मसत्तेने विज्ञानाला पापी ठरवण्याचा इतिहास इतका जुना आहे. तरीदेखील कोपर्निकस-गॅलिलिओच्या या सिद्धांतामुळे मानवी इतिहासात जगाचा अर्थ लावण्याची नवीन दृष्टी मानवाला प्राप्त झाली. नशीब, प्राक्तन, प्रारब्ध, संचित, नियती या अदृश्य शक्तींच्या पलीकडे आरपार पाहण्याची ही वैज्ञानिक दृष्टी म्हणजेच विज्ञानेश्वर.  या दृष्टीची चार वैशिष्ट्ये अशी १) प्रत्येक कार्यामागे कोणते ना कोणते कारण असतेच २) ते कारण मानवी बुद्धीला समजू शकते ३) काळाच्या एका टप्प्यावर सगळीच कारणे समजू शकत नाहीत पण भविष्यात ती समजू शकतात ४) वैज्ञानिक दृष्टी हा ज्ञानप्राप्तीचा (शब्द किंवा ग्रंथ प्रामाण्यापलिकडचा ) सर्वात खात्रीशीर आणि एकमेव मार्ग आहे.

या वैज्ञानिक दृष्टीच्या आधारेच माणसाच्या जन्म-मृत्यूमागचं कारण उकलण्यात यश आलं, सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचं कारण म्हणजेच उत्क्रांती शोधण्यात यश आलं. पाऊस, भूकंप, वीज, ज्वालामुखी, ओहोटी, भरती आदी नैसर्गिक घटनांचे अर्थ लावता आले. आधुनिक वैद्यकशास्त्र विकसित झालं. आधुनिक यंत्रं तयार करता आली, या यंत्रांमुळेच औद्योगिक क्रांतीचा पाया घातला गेला, शेती आधुनिक झाली. स्थापत्यशास्त्र वैकसित झालं . या सर्वांमुळे आजच्या मानवजातीचं जीवन सुखकर झालं, भटक्या मानवी टोळ्यांना स्थिरता आली. नागरी संस्कृती विकसित झाली. या स्थिर संस्कृतीमध्येच शिक्षणप्रसार शक्य झाला, संगीत-चित्र-शिल्प-क्रीडा आदी कलांचा विकास झाला. संदेशवहन (Communication) सुधारलं, दळणवळण (Transportation) गतिमान झालं, आयुर्मान वाढलं. थोडक्यात सांगायचं तर माणूस आता 'प्राणी' राहिला नाही, तर पृथ्वीतलावरील सर्वात विकसित सजीव झाला. विज्ञानाच्या किमयेमुळे या विकसित होण्याला नवीन नवीन आयाम प्राप्त झाले.

निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत आहे. निरीक्षण म्हणजे सी. व्ही. रामन यांनी बोटीवरून निळं आकाश आणि निळा समुद्र पाहिला, त्या निरीक्षणातून कुतूहल जागृत होऊन जन्माला तो 'रामन इफेक्ट'. रामन यांनी 'देवा तुझे किती सुंदर आकाश' म्हणत कुतूहल संपवलं नाही हे विशेष. रोज घडणाऱ्या घटनांवरून, त्यांच्या निरीक्षणातून बांधला जातो तो तर्क. पूर्वमाहितीवरून बांधलेला अंदाज म्हणजे अनुमान. प्रचिती म्हणजे वस्तुनिष्ठ अनुभव, जसा रोग्याला औषधाचा येतो तसा अनुभव. प्रयोग म्हणजे प्रत्यक्ष कृती आणि त्यातून येणारी प्रचिती. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या या मूलभूत वैशिष्ट्यांबरोबरच,  विज्ञानवादी दृष्टिकोनामुळे काही मूल्येदेखील समाजात रुजवली जातात. विज्ञान म्हणजे फक्त गणित आणि क्लिष्ट अभ्यास नव्हे तर त्याला मानवी चेहरा आणि मूल्ये आहेत. ती मूल्ये अशी - स्वायत्तता - अदृश्य शक्तींपासून मुक्त असं विश्व आहे. शोधकता - जागरूक मनाने घटनेचा शोध घेणे. सम्यकता - घटनेचा सर्व बाजूने विचार करणे. नम्रता - सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचा दावा न करणे. निर्भयता - विचारांची ताकद उभी करून, शोषणाविरोधात आवाज उठवणे. कृतिशीलता - जे सत्य समजले आहे, त्या अनुरूप कृतींमध्ये बदल करणे. अशी काही मूल्ये विज्ञानाच्या प्रसारातून समाजामध्ये रुजू शकतात.

तेव्हा अशा या विज्ञानेश्वराची प्रतिष्ठापना कशासाठी ? गेल्यावर्षी २०१६ साली व्हॉट्सऍपवर एक मेसेज आला - 'भगवद्गीतेमध्ये ११६ श्लोक आहेत, ११६ मधून तुमचे जन्मसाल वजा करा, पहा उत्तर तुमचे वय येते की नाही'. मुळामध्ये भगवद्गीतेमध्ये ११६ श्लोक नाहीत आणि ११६ चा संबंध आहे तो २०१६ शी. पण विचार कोण करणार ? दुसरा एक मेसेज होता - 'गुगल म्हणजे गुरुदेव दत्त, गणपती आणि लक्ष्मी, पहा आपली महान संस्कृती, आपल्याकडे गुगल आधीपासूनच आहे'. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. ज्या देशात बालमृत्यू, कुपोषण, बेरोजगारी, प्रदूषण, भ्रष्टाचार, स्त्री-सुरक्षितता इत्यादी अनेक प्रश्न आ-वासून उभे आहेत, तिथे so called  सुशिक्षित वर्गाने असल्या बाष्कळ आणि उथळ धार्मिक अस्मितांना कुरवाळत बसणं योग्य आहे का ? (अर्थात हत्तीचे तोंड बसवून गणपती जन्मला ती पहिली प्लॅस्टिक सर्जरी असं छातीठोक सांगणारे लोक सत्तेवर असताना, यथा राजा तथा प्रजा असंच होणार ) सण, उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या यांच्या निमित्ताने रस्त्यावर चालणारे धिंगाणे, निवडणुकीच्या निमित्ताने गोरगरिबांना घडणाऱ्या फुकट तीर्थयात्रा, ३३ कोटी देव कमी की काय म्हणून त्यात रोज भर पाडणारे बाबा - बुवा - बापू, बाहेरच्या जगात स्मार्टपणाचा मुखवटा घालणारे पण घरात फुटकळ कर्मकांडांचे अवडंबर माजवणारे सुशिक्षित ही सर्व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावाची लक्षणे आहेत.

विज्ञानाचा उदय होताना परदेशातून जी सामाजिक घुसळण झाली, विचार मंथन झालं, ते न होता विज्ञान आपल्याला आयतं मिळालं. आर्यभट्ट, भास्कराचार्य आदींनी दिलेला विज्ञान विचार आपल्या इथे दीर्घकाळ टिकला नाही. आपल्याकडं प्राधान्यानं रुजली ती निरर्थक कर्मकांडं, विवेकशून्य रूढी आणि शोषणप्रधान धर्म  आणि जातीव्यवस्था. जाती-धर्मावरून भेदभाव करणारी उच्च-नीचता आपल्याकडे रुजली. स्त्रियांना आणि खालच्या जातीतल्या मानल्या गेलेल्यांना शिक्षणाची संधी नाकारली गेली. आपल्याकडच्या चाकोरीबद्ध शिक्षणव्यवस्थेत मुलांना प्रश्न विचारायला न शिकवता, जे सांगितलंय तेच खरं मानायला शिकवलं गेलं. कुटुंबांमधून पुरुषप्रधान एकाधिकारशाही रुजली. व्यक्तींचं दैवतीकरण केलं गेलं. या सगळ्या कारणांमुळे चिकित्सा, जिज्ञासा दाबली गेली. श्रद्धास्थानं, धर्म यांची चिकित्सा झाली नाही. लोकांच्या परंपरावादी मानसिकतेचा फायदा उठविण्यासाठी राजकारण्यांनी धर्म आणि जात यांनाच राजकारणाचं साधन बनवलं. ( अलीकडे झालेल्या निवडणुकांमध्ये शिवाजीमहाराजांच्या नावानेच मतांचा जोगवा मागितला गेला. आजकाल विकासाचे राजकारण असा शब्दप्रयोग होतो तोदेखील मतांसाठीच) मुखवटा आधुनिकतेचा आणि चेहरा मात्र जुनाट परंपरावादी अशा 'अर्ध्या पुढारलेल्या' समाजात आपण राहतो. म्हणूनच विज्ञानवादाची कास धरा असं सांगणाऱ्याचा पुण्यामध्ये दिवसाढवळ्या खून होऊनसुद्धा सुशिक्षितांना याची जराही खंत वाटत नाही, उलट आपल्या धर्माची चिकित्सा करणारा माणूस गेला म्हणून काही लोकांना आनंदच होतो.

ज्या लोकांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाचा भरपूर वापर आहे आणि भौतिक सुखं ज्यांच्या पायाशी लोळण घेत आहेत, त्या इंडियन लोकांचा वरती उल्लेख केलेल्या समस्या तितक्याशा गंभीर नाहीत किंवा त्या समस्याच नाहीत असा समज होऊ शकतो. पण जोपर्यंत हे इंडियन भारतीयांच्या समस्या समजून घेत नाहीत तोपर्यंत आणि या समस्यांची उत्तरं धर्मामध्ये नसून विज्ञानवादात आहेत हे त्यांना कळत नाही तोपर्यंत विज्ञानेश्वराची प्रतिष्ठापना घराघरांतून होणे शक्य नाही. भारतातल्या समस्यांचा पाढा वाचायचा झाला तरी तोदेखील शक्य नाही. पण आकड्यांच्या भाषेत भारतातल्या मानवी विकासाची स्थिती काय आहे हे पाहुयात. देशातल्या लोकांचं आयुर्मान, शिक्षणाचं प्रमाण आणि दरडोई उत्पन्न या मूलभूत गोष्टींवरून देशाचा 'मानव विकास निर्देशांक' मोजण्यात येतो. २०१५ च्या रिपोर्टनुसार या यादीमध्ये भारताचा क्रमांक १३० वा येतो. उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, मोरोक्को, चीन, रशिया, श्रीलंका आदी देशदेखील या क्रमवारीत आपल्या पुढे आहेत. आपल्या मानव विकासाच्या समस्यांची कारणं काहीही असली तरी, प्रथम या देशात समस्या आहेत हे मान्य करायला पाहिजे, ते एकदा मान्य केलं की त्यांची उत्तरं शोधायला पाहिजेत, इतर कशामध्ये उत्तरं सापडली नाहीत तरी याची उत्तरं विज्ञानवादाकडे जरूर असतील आणि आज नसली तरी भविष्यात ती विज्ञानाला नक्की सापडतील. विकसनशीलतेच्या टप्प्यावर अडखळणाऱ्या भारताचा विकसित राष्ट्राकडे प्रवास होण्याकरता घराघरातून आणि मनामनातून विज्ञानेश्वराची प्रतिष्ठापना होणं गरजेचं आहे

​'ने मजसी ने' किंवा 'जयोस्तुते श्रीमहन्मंगले ' म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला माहिती आहेत, पण विज्ञाननिष्ठ सावरकर आपल्याला माहित नाहीत किंवा माहिती आहेत पण ते आपल्या सोयीचे नाहीत. त्यांच्याच दोन वाक्यांनी लेखाचा समारोप १) यज्ञाचे वणवे पेटलेल्या भारतवर्षात दहा वर्षात जितके दुष्काळ पडतात, तितके दुष्काळ 'दीड दमडीच्या काडेपेटीत ज्यांनी अग्नीला कोंडले' त्या युरोपात शंभर वर्षातही पडत नाहीत. यज्ञमंत्र आणि पर्जन्यसूक्ते म्हणत भारतवर्षाचा कंठ कोरडा झाला तरी या धार्मिक मतास पाऊस काही भीक घालत नाही. २) भारताला काळाच्या तडाख्यातून वाचायचे असेल तर श्रुतिस्मृतीपुराणोक्ताची शास्त्रे गुंडाळून त्यांना संग्रहालयात ठेवले पाहिजे आणि विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे. पुराणाचा अधिकार 'काल काय झाले' इतके सांगण्यापुरता. 'आज काय योग्य' ते सांगण्याचा अधिकार फक्त विज्ञानाचा.

विज्ञानाच्या बळावरती आपल्या देशाचा आणि सर्वांचा 'तिमिरातुनी तेजाकडे' प्रवास होवो.

​(डॉ. अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर दैनिक लोकसताने 'विज्ञानेश्वराचे प्रस्थान' असे संपादकीय लिहिले होते. या संपादकीयाच्या शीर्षकाचा संदर्भ घेत या लेखाचे शीर्षक लिहिले आहे - 'विज्ञानेश्वराची प्रतिष्ठापना')

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

आईचा साठावा वाढदिवस

देखणी ती जीवने - महाराष्ट्रदिन विशेष