तीन वर्षं बीजेपी सरकार: दाटून कंठ येतो

अहाहा काय तो सोनेरी दिवस ! २६ मे २०१४ ! माझ्या आधीच्या चार पाच पिढ्यांनी राज्याभिषेक कधी पाहिलाच नव्हता. तो पाहण्याचा सुवर्णयोग जुळून आला तो यादिवशी. समस्त सार्क देशांच्या प्रमुखांच्या साक्षीने आणि देशी-परदेशी मीडियावाल्यांच्या कष्टामुळे हा सोहळा सवासो क्रोर देशवासी पाहू शकले. यातील काही ज्येष्ठ मंडळींना वाटून गेलं 'तो माझी लोचने मिटो यावी - बास आता डोळे मिटले तरी चालतील, आता या देशाची मला काळजी नाही', तर काही ज्येष्ठांना २०१४ च्या आधी लोचने मिटून घ्यावी वाटत होतं, पण आता ते म्हणाले नको इतक्यात आता थोडेच दिवस राहिलेत एकदा का या देशाचं नंदनवन झालं की ते पाहू आणि जाऊ !

त्या दिवसापासून या नंदनवनाकडे अशी काही वाटचाल सुरु झाली की आश्चर्याने दहा बोटे तोंडात जावीत. राज्याभिषेकाला उपस्थित सर्व सार्क देशांच्या प्रमुखांनी त्या दिवसापासून भारतावर जो काही मदतीचा वर्षाव केला त्याला तोड नाही. त्यात चीन आणि पाकिस्तान नंबर एक ला, त्यांनी कशाकशाचा वर्षाव केला याची मोजदाद केंद्रातलं कोणतंच खातं करू शकत नाही. त्यानंतर या सत्ताधीशांनी भारताच्या स्वच्छतेचा संकल्प सोडला, प्रयत्न इतका प्रामाणिक की ०.५ टक्के सेवा कर वाढवून समस्त देशवासियांना या राष्ट्रउभारणीच्या कार्यात सरकारनं सामील करून घेतलं. वाराणसीच्या घाटापासून पुण्याच्या उरळी कांचन पर्यंत कचऱ्याचं 'कांचन' करण्याचा हा कार्यक्रम. आजकाल प्रत्येक सेवा खरेदी करताना आमचा ऊरच भरून येतो की आता या खरेदीतील ०.५ टक्के रुपये मी सरकारला दान देतोय आणि सरकार आता केवढी स्वच्छता करतंय. बरं ही स्वच्छता तेवढ्यापुरतीच मर्यादित नाहिये.

सरकारच्या प्रमुखांनी त्यानंतर परदेशांमध्ये जाऊन भारताची प्रतिमा स्वच्छ केली. मला उगाच गदिमा आठवले 'प्रत्यक्षाहूनि प्रतिमा उत्कट'. परदेशात राहून भारताची कितीकिती काळजी करणाऱ्या अनिवासी भारतीयांची पण चिंता मिटली, आता आपले आई वडील, बहीण भाऊ पण सुखाच्या नंदनवनात राहणार म्हणून.  काय जल्लोष केला त्यांनी पंतप्रधानांच्या उपस्थिती आणि म्हणाले सुद्धा - तुम्ही देश सुधारा आम्ही लगेच भारतात परत येऊ आणि राष्ट्राला परम वैभवाला न्यायच्या तुमच्या कार्यात मोठा हातभार लावू. आता तर म्हणे रांग लागली आहे अशा परत येणाऱ्यांची, ट्रम्प भाऊ म्हणतायत - मोदीजी असं नका ना करू, राहू देत या लोकांना इकडे.

त्यानंतर तर एकदा पंतप्रधान संसदेच्याच पाया पडले, आणि हळूच त्या पायरीच्या कानात त्यांनी वचन दिलं - 'तू आणि तुझी संसद कशीही वागली तरी मी काही बोलणार नाही, माझ्या आधीचे मौनीबाबा होते ना अगदी तसंच', आणि ती पायरी एकदम थरारून गेली - विठ्ठ्लाच्या पायी थरारली वीट, अगदी तशी. तिला वाटलेलं देशभर हा मोदीबाबा कित्ती बोलतो आता मला याच्या कडून खूप काही ऐकायला मिळेल. कसलं काय कसलं काय तिचा अपेक्षाभंगच तो. पण आमची स्थिती मात्र तो पाया पडण्याचा प्रसंग पाहून - दाटून कंठ येतो अशीच झाली. संसदेची उंची केवढी वाढली मागच्या तीन वर्षात. असे सगळेच खासदार संसदेच्या पाया पडते तर संसदेची उंची वाढून वाढून मंगळयानाला भेटण्याएवढी उंच झाली असती.

पिछले सत्तर साल मी कुछ नही हुआ हे पालुपद तर या सरकारचं कित्ती लाडकं. मोदी साहेब परदेशातल्या भारतीयांसोबत बोलत होते, उगाच सगळ्यांना वाटलं, बहुतेक ही सगळी लोकं तक्षशिला आणि नालंदा विद्यापिठाची पदवीधर लोकं असावीत कारण मागच्या सत्तर वर्षात इतकी सगळी लोकं शिकून सवरून परदेशात जाणं शक्य तरी आहे का ? तसंच मला वाटलं मंगलयान उडताना पाहून, कदाचित हे यान पण ऋषिमुनींनी बनवलेलं असावं, गेल्या सत्तर वर्षात एकतरी उपग्रह सोडलाय का आपण, उगाचच काहीतरी टाईमपास करत होते ISRO, DRDO मधले लोक इतके वर्षं. आत्ताआत्ता कुठे ते कामाला लागले. असो आता आठवण देखील नको त्या सत्तर वर्षांची.

एकदिवस सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा आला आणि त्यांनी शेतकऱ्याला श्रीमंत करायचं ठरवलं, त्यासाठी शेतकऱ्याला शेतीत वगैरे राबायची गरजच नव्हती. एक कायदा केला की सगळे शेतकरी श्रीमंत - जमीन अधिग्रहण विधेयक. पण प्रत्येक देशात नतद्रष्ट लोक असतात काही, त्यांना कुठं हे पाहावलं. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदी चिंतातुर जंतूंनी हाणून पाडला ना हा कायदा. आणि बिचारे शेतकरी बसले 'तूर' लावत. आणि सरकारला तीन वर्षांनी तुरीच्या नको त्या आफतीला सामोरं जायला लागलं. सरकारचा चांगला हेतूच लक्षात येत नाहीये लोकांच्या, आता शेतीत वगैरे राबायचं नाही भारतीयांनी, ती कामं आणि अन्नधान्य आयात करू या ना आपण. आपण फक्त - 'मेक इन इंडिया' करायचं. मोठ्या conference घ्यायच्या. अगदी नजर लागावेत इतके प्रामाणिक उद्योगपती सरकारच्या उश्यापायश्याला आहेत त्यांना काम नको का द्यायला. या conferences मधून हे काम मिळवायचं. मिळू पण लागलंय काम, किती रोजगार निर्माण झालेत पाहिले का तुम्ही, सरकारचं लक्ष्य आहे दोन कोटी रॊजगार प्रत्येक वर्षी, बघाच आता. रोजगार हमी वगैरे फालतू योजना नाहीच राबवायला लागणार, आधीच्या सरकारच्या अकार्यक्षमतेची ती थडगी बघा आता हे सरकार कसं उधळून लावतंय ते.

आणि गोष्ट थडगी उधळण्याचीच नाहीये, थडगी बांधण्याची पण आहे. २०१४ ला नमोंनी किती जीवाचा आटापिटा करून सांगितलं की आधीचे सत्ताधारी भ्रष्ट आहेत, खरंही होतं ते. पण आता बघा ना तुरुंग किती भरून गेलेत सगळे आधीचे मंत्री आता तुरुंगात आहेत, बघा बांधली की नाही त्यांची थडगी. किती फटाफट केसेस दाखल केल्या या सरकारने, बुलेट ट्रेन पण लाजली मनामध्ये. आणि हो एक स्कीम पण सुरु केली आहे या सरकारनं - पश्चाताप होत असेल तर आमच्या पक्षात या, आमची बौद्धिके अभ्यासा आणि वाल्याचे वाल्मिकी व्हा. किती छान, कित्येक जणांनी याचा लाभ घेतला याचा. आता महाराष्ट्रातल्या कोकणातलं एक नररत्न पण या स्कीमचा लाभ घेणाराय म्हणे. असो आपल्या देशाचं ब्रीदवाक्य आहे की नाही - मै ना खाऊंगा .... , आता फक्त पतंजलीचे ज्यूस प्यायचे, कुणीही काहीही खायचं नाही.

खाण्या वरून आठवलं. सरकारला किती काळजी आहे आपली. तुम्ही गोमांस खाणार तुमचं पोट बिघडणार, संस्कृती डुबणार आणि महत्वाचं म्हणजे पाणी जास्त वाया जाणार. नकोच ते सगळं गोमांस बंदीच करून टाकणार आहेत हे. आणि हो गोमांस खाल्ल्याचा संशय जरी आला ना सरकारच्या लाडक्या भक्तांना तर मारून पण टाकतील हं ते, जरा सांभाळून. आणि तिकडे रोहित वेमुलाचं पाहिलं न काय झालं, सगळं ऐकायचं सरकारचं, उगाच आपली अक्कल चालवायची नाही. बुद्धिवादी वगैरे म्हणवून घ्याल तर याद राखा, इथे फक्त राष्ट्रवाद्यांनी राहायचं. अहो घड्याळवाले राष्ट्रवादी नव्हे. सरकार ठरवेल ते राष्ट्रवादी. सकाळी उठल्याउठल्या जयहिंद, भारत माता की जय म्हणणारे, तिरंग्याला न चुकता प्रणाम करणारे .. ध्वज प्रणाम एक, दो, तीन. असे सगळे राष्ट्रवादी. बुद्धिवादी उगाच वेळ वाया घालवतात आर्थिक विकास, रोजगार, गरिबी, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, शेती ..  हे काय विषय आहेत का चघळायचे. बोलायचं तर सरदार पटेलांवर, सावरकरांवर, ३७० कलमावर झालंच तर ५००० साल पुराने संस्कृतीवर.

आणि पाकिस्तान आणि काश्मीर विषयावर काही बोलूच नका कुणी. सरकारला सगळं माहितीये, अखंड भारत करायचाय ना, कुणी बोलून खोडा नका घालू त्याच्यात. आधीची मूर्ख सरकारं काय टाईमपास करत होती. आता आम्ही बघा चुटकीसरशी सोडवणार आहे प्रश्न. आमची परराष्ट्रनीती माहितीये ना. वाढदिवसाला भेट द्यायची पाकिस्तानला आणि सर्जिकल स्ट्राईक करायचा. केवढी शांतता आहे नाही सीमेवर या स्ट्राईकनंतर. आता एक-दोन मुंडकी उडाली सैनिकांची नंतर पण ठीक आहे, थोडे अपशकुन व्हायचेच. आणि परिस्थिती इतकी सुधारली आहे की आता अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री एकच आहेत. दोन्हिकडे सर्जिकल स्ट्राईक करून झालेत. पर्रीकरांच्या दिल्लीतल्या कारकिर्दीची इतिश्री झाली, इतकं यश मिळालंय सीमेवरती. आता जेटलीसाहेब बघतील संरक्षण. नोटबंदी झाली काळा पैसा संपला, जीएसटी आलंय, आता अर्थखात्यात पण काम कमीच होईल. जेटली आता क्रिकेट मध्ये लक्ष घालायला मोकळे.  आठवतीये का नोटाबंदी, राष्ट्रभक्तीचा पूर आलेला की नाही रस्त्यांवर, एवढा पूर तर १९४७ च्या आधीपण आला नसेल.

लोकांचा किती विश्वास आहे सरकारवर. बिहार, पंजाब आणि दिल्ली ही तीन राज्यं द्या सोडून, बाकी ठिकाणी आठवतंय की नाही कसे जिंकलंय सरकार. विरोधीपक्ष जिवंत तरी आहेत का ? तरीपण २०१९ ची तयारी आम्ही जोरदारच करणार आहोत. काही दगा फटका व्हायला नको. किती काम केलंय सरकारनं, ते लोकांपर्यंत पोहोचवायचंय. आजकाल मीडिया सरकारच्या चांगल्या बातम्या दाखवतच नाही, त्यामुळे मग सरकारलाच कष्ट पडतात, प्रसिद्धी करण्याचे. बाकी या सरकारला जरासुद्धा प्रसिद्धी मिळवायची सवय नाही. कामातूनच बोलतं सरकार. आजसुद्धा तब्बल तीन वर्षं झाली सरकारला तरी पण एकच जाहिरात दिली सरकारने. आणि प्रसिद्धी प्रसिद्धी म्हणजे काय - जनतेनं दिलेला कराचा पैसे किती सार्थकी लागलाय ते सांगणं म्हणजे पाय चूक आहे का ?

आणि हो एक सांगायचं राहिलंच. आता की नाही सरकारला गरजच नाही प्रसिद्धी वगैरे मिळवायची. त्याच्या साठी किती भक्तमंडळी तयार आहेत. आणि त्यांना की नाही निगेटिव्ह काही दिसत नाही आणि दिसलं तरी बोलवत नाही. किती देशभक्त आहेत हे लोक. नाहीतर काही देशद्रोही जरा जरा म्हणून चांगलं दिसत नाही यांना. गंगा स्वच्छ झाली दिसत नाही, काळा पैसा संपला दिसत नाही, शेतकरी श्रीमंत होऊ लागला दिसत नाही, रोजगार वाढला दिसत नाही, टोल बंद केले दिसत नाही, किती अँप्स आणि पोर्टल्स सुरु केली सरकारनं दिसतच नाहीत यांना. जरा तरी पॉसिटीव्ह राहायला पाहिजे बाबा या लोकांनी.

असो ! किती विषय सांगू, दाटून कंठ येता येता, फाटून जायचा कंठ. मागच्याच आठवड्यात एक भक्त भेटला, जरा स्वारी चिडलेलीच - RTO ऑफिसमधून काही (५ किंवा ६) हजार देऊन विदाउट टेस्ट ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन आला होता. म्हणाला - काही नाही नुसत्याच घोषणा .....  मै न खाऊंगा  .... पावलो पावली खातात साले हे ... दगडापेक्षा वीट मऊ .. इतकाच काय तो बदल. मी म्हणालो - असं बोलू नकोस, पाप लागेल. वीट ! काय ही भाषा ? अरे दगड झालेल्या काँग्रेसच्या गोवऱ्या आपण तिकडे केव्हाच पोहोचवल्या, आता वीट झालेल्या बीजेपी च्या विटा आपण अयोध्येला पोहोचवू, निदान राममंदिर तरी पूर्ण होईल. आणि मग तो पुरुषोत्तम रामचंद्र प्रसन्न होऊन हे सरकार आपल्या जगण्याचं सोनं करेल. अहाहा सगळी कडे रंगीबेरंगी फुलं दिसत आहेत, पतंजलीच्या उदबत्त्यांचा सुगंध पसरलाय, आत्ताच राष्टगीत वाजून गेलंय, आता एक पद्य होईल, नंतर श्रीश्रींची भजनं आणि शेवटी वंदे मातरम संपूर्ण. अयोध्येतला प्रभू रामचंद्र, अरबी समुद्रात विराजमान होणारे छत्रपती शिवराय, इंदूमिल मध्ये विराजमान होणारे आंबेडकर, गगनचुंबी पुतळ्यामध्ये विराजमान होणारे सरदार वल्लभभाई पटेल आणि रस्त्यावरच्या झाडुझाडूंत वसलेले राष्ट्रपिता यांच्या आशीर्वाद असाच कायम राहू दे !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

आईचा साठावा वाढदिवस

देखणी ती जीवने - महाराष्ट्रदिन विशेष