सरदार पटेलांच्या नेहरूंना शुभेच्छा

सरदार पटेलांच्या नेहरूंना शुभेच्छा !

३१ ऑक्टोबर २०१८, केदार क्षीरसागर

फक्त विकासाच्या नावावर राजकारण करण्याचं धाडस भारतामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने केलेलं नाही. आजपर्यंत विकासाबरोबरच काही भावनिक मुद्द्यांची फोडणी देत भारतीय राजकारण शिजत आलेलं आहे. या भावनिक मुद्द्यांमध्ये धर्म, जात, संस्कृती, परंपरा, इतिहास, देशाची सुरक्षा, लष्कराचं कर्तृत्व, भाषा, सण-समारंभ यांचं गरजेनुसार उदात्तीकरण, गौरवीकरण किंवा मोडतोड, विद्रुपीकरण यांचा समावेश असतो. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी विकासाचा बुरखा पांघरून इतिहासाची मोडतोड आणि त्यातील पात्रांचं खलनायकीकरण करत जनतेला फुटकळ भावनिक मुद्द्यांवर 'भारून' टाकण्याचे प्रयोग केले आहेत, जेणेकरून विकासाच्या मुद्द्यावरती कोणाचं लक्ष जाऊ नये. जसजशा निवडणूका जवळ येतील तसे हे भारून टाकण्याचे प्रयोग वाढत जातील.

गेल्या सत्तर वर्षांमध्ये भारतात लाखो पुतळे उभारले गेले असतील, पण त्या पुतळ्यांमधल्या व्यक्तींच्या आदर्शांवर चालण्याच्या नावाने आपल्याकडे आनंदच आहे. तरीही सत्तांतर झाल्यानंतर या नवीन सेवक मंडळाने हे 'पुतळीकरणाचे' समाजकार्य अखंडित ठेवले आहे. अरबी समुद्रात शिवाजी महाराज, इंदू मिलमध्ये आंबेडकर आणि गुजरातेत सरदार पटेल आता भव्य 'पुतळे' बनून राहणार आहेत. यांतल्या सरदार पटेलांचा वापर या लोकांनी नेहरूंची निंदा-नालस्ती करण्यासाठी केला आहे. नेहरू-गांधींनी पटेलांवर अन्याय केला, नेहरूंनी पटेलांना कमी लेखलं, पटेल पंतप्रधान असते तर देशाचं चित्र आज वेगळं असतं, अशा जर-तरच्या कंड्या पिकवत नेहरूंच्या विषयी सामान्य जनतेच्या मनात विष कालवण्याचं राष्ट्रीय कार्य या लोकांनी मनापासून केलं आहे. पटेलांनी यांच्या मातृसंस्थेला गांधीहत्येसाठी अप्रत्यक्ष जबाबदार ठरवलं आणि त्यांच्यावर बंदी देखील घातली या गैरसोयीच्या मुद्द्यांवर हे लोक सोयीस्कर मौन पाळतात. या नेहरू-पटेल विकृतीकरणाचा कळसाध्याय येत्या ३१ ऑक्टोबरला लिहिला जाईल. १४ ऑक्टोबर १९४९ ला पटेलांनी नेहरूंच्या वाढदिवसानिमित (१४ नोव्हेंबर) एक शुभेच्छापत्र लिहिलं आहे, या इंग्रजी पत्राचं भाषांतर करण्याचा प्रयत्न याठिकाणी करत आहे. हे पत्र वाचल्यानंतर नेहरु आणि पटेल यांच्यामध्ये अनेक विषयांवरती मतभेद असूनही ते एकमेकांच्या किती जवळ होते तसेच त्या परस्परांमध्ये किती अकृत्रिम प्रेम होते याचं दर्शन निश्चित होईल.

----------------------------

जवाहरलाल आणि मी काँग्रेसचे सदस्य आहोत. त्याचबरोबर आम्ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक आणि काँग्रेस वर्किंग कमिटीतील  सहकारी आहोत. देशाचे गंभीर प्रश्न आता ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपल्याला सोडवायचेत त्या आपल्याला दुर्दैवीरित्या सोडून गेलेल्या थोर गांधीजींचे आम्ही अनुयायी आहोत. या प्रचंड देशाच्या अत्यंत कठीण अशा संचालनाची जबाबदारी वाटून घेणारे आम्ही वाटेकरी आहोत. आम्हाला दोघांनाही ज्या अनेक विषयांमध्ये रुची आहे त्या विषयांमध्ये एकत्र काम करत असताना आम्हाला एकमेकांविषयी जिव्हाळा वाटत आला आहे. जसजशी वर्षे पुढे जात आहेत तसे आमच्यातील हे प्रेम वाढतच जात आहे. देशाच्या महत्वाच्या प्रश्नांवर काम करत असताना जेव्हा आम्ही एकमेकांच्या सोबत नसतो, एकमेकांशी आम्ही सल्लामसलत करू शकत नाही, तेव्हा जी पोकळी आम्हाला जाणवते त्याची कल्पना इतर लोक करू शकत नाहीत. ही जवळीक, हा परिचय, हे बंधुप्रेमाचं नातं यांच्यामुळे त्याचं सर्वांसमोर कौतुक करताना मला अवघडल्यासारखं होतंय. या देशाचा आदर्श, लोकांचा नेता, देशाचा पंतप्रधान, ज्याची कारकीर्द आणि उत्तुंग कर्तृत्व हे 'खुली 'किताब' आहे, अशा जवाहरला माझ्या कौतुकाची खरंतर गरज नाहीये.

या स्वच्छ मनाच्या द्रष्ट्या सैनिकाने नेहमीच परकीय सत्तेविरोधात निकराचा संघर्ष केला आहे. वयाच्या तिशीमध्ये शेतकरी चळवळीचं नियोजन करताना त्याला जो सशस्त्रतेतुन झालेल्या उद्रेकाचा धडा मिळाला त्यामुळे तो शांततेच्या मार्गाकडे वळाला आणि त्या मार्गावर लढण्याची कला आणि ज्ञान त्याला प्राप्त झालं. त्याची भावनाशीलता आणि अन्याय, क्रूरता यांविषयीची चीड यामुळे तो गरिबी विरुद्धच्या संग्रामात एक सैनिक म्हणून सामील झाला. गरिबांच्याप्रति असलेल्या दयाशील वृत्तीमुळे तो तन आणि मन दोन्हींनी शेतकऱयांच्या चळवळीकडे ओढला गेला. त्याच्या कार्याचा परीघ वाढत जाऊन लवकरच तो स्वातंत्र्य चळवळीचा कुशल संघटक म्हणून पुढे आला. उच्चप्रतीचा आदर्शवाद, कला आणि सौंदर्याचा उपासक, इतरेजनांना प्रेरित आणि संघटित करण्याची शक्ती आणि अनेक व्यक्तींमध्ये उठून दिसेल असे व्यक्तिमत्व यांमुळे जवाहरचा राजकीय नेता म्हणून उदय होत गेला. पत्नीच्या आजारपणामुळे परदेशात गेलेल्या जवाहरने भारतीय राष्ट्रवादाचा आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून विचार केला. भारतांतर्गत समस्यांकडे ज्या जागतिक नजरेने तो पाहात असे ती नजर त्याला इथे मिळाली. त्यानंतर त्याने  कधी मागे वळून पाहिलेच नाही. भारतात आणि भारताबाहेर लोक त्याचे नाव आदराने घेऊ लागले. विचारांची दृढता आणि खोली, नजरेतला निश्चय आणि मनाचा प्रामाणिकपणा यांमुळे भारतातील तसेच परदेशातील अनेक लोक त्याचे चाहते झाले.

स्वातंत्र्याची पहाट होण्यापूर्वी जवाहरने आम्हा स्वातंत्र्यसंग्रामातील लोकांसाठी पथदर्शी बनून काम केले. स्वातंत्र्यानंतर आलेल्या संकटाच्या काळात जवाहरने आम्हाला एक विश्वास दिला आणि देशाला सक्षम नेतृत्व दिले. मागच्या दोन वर्षांच्या काळात त्याने देशासाठी काय काय यातना सहन केल्या हे माझ्यापेक्षा दुसऱ्या कुणाला माहिती असू शकत नाही. पंतप्रधान कार्यालयातल्या जबाबदाऱ्या वाहताना त्याला थकून जाताना मी पाहिलेआहे. समोर आलेल्या प्रत्त्येक अडचणींवर काम करत असताना त्याने स्वतःसाठी कधी वेळ दिलाच नाही. राष्ट्रकुल संघटनेच्या कामात त्याने महत्वाचं योगदान दिलं आहे. जगाच्या राजकीय रंगमंचावरील त्याचे कार्य दखलपात्र ठरले आहे. हे सर्व करत असताना त्याने स्वतःला तरुण ठेवण्याची किमया साधली आहे. त्याच्या विचारांची दिशा, स्थितप्रज्ञता, व्यक्तिमत्वातली प्रसन्नता हे सर्व त्याच्या शिस्तबद्ध विचारसरणीचे आणि कुशल बुद्धीचे परिणाम आहेत. आम्ही काहीवेळा त्याच्या चिडण्याचे प्रसंग अनुभवले आहेत, पण ते त्याची कामातली तत्परता, अचूकता, दिरंगाई व चूक यांविषयीची चीड यांचे परिणामस्वरूप होते. त्याच्या रागाने अनेकदा व्यवस्थेतला आळशीपणा, दिरंगाई, अनिच्छा, शब्दांचा आणि सूचनांचा फापटपसारा यांवर मत केली आहे.

त्याच्यापेक्षा वयाने मोठा असल्याने, सरकारचं संचालन आणि काँग्रेसचं संघटन या दोन्ही ठिकाणी मी त्याला अनेकदा मार्गदर्शन केले आहे. काही मतलबी माणसांनी आमच्या नात्याविषयी गैरसमज पसरवले असले तरी आम्ही दोघांनी आयुष्यभराचे मित्र आणि सहकारी म्हणून काम केले आहे. एकमेकांच्या वैचारिक मतभिन्नतेच्या प्रसंगी काळाची गरज ओळखून आम्ही निर्णय घेतले आहेत. एकमेकांवर गाढ विश्वास असलेले लोकच करू शकतील त्याप्रमाणे आम्ही एकमेकांच्या सल्ल्यांचा, मतांचा आदर केला आहे. जवाहरच्या स्वभावाला तरुणपणातला उत्साह ते पोक्त वयातला गंभीर विचार अशी किनार आहे. याबरोबरीनेच तो कुटुंबातल्या सर्वांबरोबर खेळकरपणे वावरत असतो. व्यक्तिमत्वातलं वैविध्य आणि प्रसंगानुरूप वागण्याची हातोटी हे त्याच्या तरुणपणाचं रहस्य आहे, ज्याच्यामुळं त्याचं सोबत असणं खूप आश्वासक वाटत राहतं.

या त्रोटक शब्दांमध्ये त्याच्या व्यक्तित्वाविषयी बोलणं म्हणजे त्याच्यावर अन्यायच ठरेल. त्याच्या विचारामध्ये कधीकधी अविश्वसनीय वाटेल इतकी सखोलता असते. पण त्याच्यामागे नेहमीच पारदर्शी प्रामाणिकता आणि कणखरपणा असतो. याच्यामुळेच जात, धर्म, पंथ यांच्यापलीकडे जाऊन भारतीय त्याच्यावर प्रेम करतात. त्याच्या हीरकमहोत्सवी वाढदिवसादिवशी आपण अमूल्य अशा भारतीय स्वातंत्र्याविषयी आदर व्यक्त करूयात. देशसेवेमध्ये आणि त्याच्या आदर्शाच्या शोधात जवाहरला उत्तरोत्तर यश येत जावो हीच सदिच्छा !

- सरदार पटेल

-----------------------------------------------------

पं. नेहरूंनी १ ऑगस्ट १९४७ ला formality म्हणून सरदार पटेलांना नव्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी पत्र लिहिलं. त्याला सरदारजींनी पाठवलेलं पत्रोत्तरदेखील वाचनीय आहे

प्रिय जवाहर,

आपली एकमेकांच्यातली जवळीक आणि प्रेम, तसेच मागच्या जवळपास तीस वर्षांपासून असेलेली मैत्री यामुळे आपल्याला औपचारिकतेची मुळीच गरज नाही. मी तुझ्यासोबत कोणत्याही प्रकारचे काम करण्यासाठी तयार आहे. भारतातल्या कोणत्याही व्यक्तीने केला नसेल इतका त्याग तू ज्या कारणांसाठी केलास त्या कारणांच्या पूर्तता करण्याच्या महान कार्यात मी माझ्या उरलेल्या आयुष्यात निश्चितपणे, प्रामाणिकपणे सहभागी होईन. आपल्या दोघांची जोडी कधीच तुटणार नाही आणि तीच आपली सर्वात मोठी ताकद आहे

- सरदार पटेल

(National Book Trust - 'Nehru Patel Agreement with differences १९३३-५०' ह्या पुस्तकातून )

-----------------------------------------------------

शेवटच्या आजारपणाच्या काळात सरदार पटेलांनी काकासाहेब गाडगीळांना सांगितलं होतं की - 'मी ज्यादिवशी जाईन त्यादिवशी जवाहरची खूप काळजी घ्या, तुम्ही दिवसभर त्याच्यासोबत राहा, माझ्या जाण्याचा त्याला मोठा धक्का बसणार आहे'. यानंतरही नेहरू-पटेल यांच्यात खूप मोठी दुही होती असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा स्वतःला फसवण्याचा उद्योग असेल. 'त्यांचे' तुम्हाला फसवण्याचे, खोटे बोलण्याचे उद्योग सुरूच राहतील, तुम्हीदेखील प्रश्न न विचारता भव्यता आणि दिव्यतेच्या गोष्टी करत 'पुतळे' बनून जावं यासाठी 'ते' नेहमीच प्रयत्न करतील, आपण एकच लक्षात ठेवुयात - 'दुसऱ्यांचे पुतळे उभारून स्वतःची उंची वाढत नसते'.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

आईचा साठावा वाढदिवस

देखणी ती जीवने - महाराष्ट्रदिन विशेष