सैराट चित्रपटाच्या पलीकडे

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपट प्रदर्शित होऊन तीन-चार आठवडे झाले. चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच गारुड केले. ऐतिहासिक 'कमाई' करत चित्रपटाने नवा इतिहास रचला. चित्रपटाच्या बाजूने आणि विरोधात बऱ्याच चर्चा होत आहेत. काहीजणांनी चित्रपटाच्या आशयाविषयी आणि त्याच्या परिणामांविषयी प्रामाणिकपणे चिंता व्यक्त केली तर चित्रपटाच्या यशामुळे काहीजणांना पोटदुखी होऊन त्यांना 'संस्कृतीरक्षणाचा' कढ आला आहे आणि काही चिंतातूर जंतूंनी नागराज यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटनादेखील चर्चेला घेतल्या आहेत. दोन वेगवेगळ्या जातीतील नायक-नायिका, त्यांचे प्रेमप्रकरण, लग्न आणि त्यातून शेवटी होणारे 'ऑनर किलिंग' अर्थात प्रतिष्ठेच्यापायी केलेला खून, एवढाच विषय घेऊन केलेला हा चित्रपट. चित्रपटाकडे दोन प्रकारच्या नजरेने पाहता येते. पहिली नजर निव्वळ 'कलेची', एक सुंदर कलात्मकरीतीने केलेलं सादरीकरण म्हणून चित्रपट पाहता येतो, त्याचा आनंद घेता येतो आणि त्यातली गाणी म्हणत, गुणगुणत सोडूनदेखील देता येतो. पण दुसऱ्या नजरेने अर्थात 'सामाजिक' नजरेनेदेखील हा चित्रपट पाहता येतो. समाजातल्या आंतरजातीय प्रेमविवाहांना असलेल्या विरोधाला पाहताना अनेक सामाजिक ताण्याबाण्यांचा संबंध चित्रपटाशी जोडता येतो.
        निव्वळ कलेच्या दृष्टीने आणि चित्रपटाच्या विविधअंगांनी पाहिलं तर सैराट खूपच सुंदर वाटतो. सैराट प्रदर्शित होण्यापूर्वीच लोक त्याची गाणी गुणगुणू लागले होतेच, गाण्याचा ठेका सर्वाना 'याड लावत ' होता आणि आहे (सैराटमधलं अजय-अतुल यांचं संगीत ढोल-ताश्यांच्या प्रभावातून बाहेर आलेलं आहे. अजय-अतुल यांनी गीतकार म्हणून लिहिलेल्या सैराटमधील गाण्यांचे शब्ददेखील दाद देण्यासारखे आहेत). चित्रपटात अभिनय करणारे चेहरे पाहिले तर तगडी स्टार कास्ट (सुप्रसिध्द, सुपरिचित चेहरे) सैराटमध्ये बिल्कूल दिसत नाहीत (अपवाद दोन मिनिटांसाठी दिसणाऱ्या ज्योती सुभाष यांचा), तर अशा नवख्या कलाकारांना घेऊन देखील चित्रपट प्रचंड यशस्वी होतो ही जमेची बाजू आहे. चित्रपटाची कथा प्रवाही आहे, चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. प्रत्येक सीन आणि संवाद विचारपूर्वक योजला असल्याचं दिसतं. सैराटचं चित्रण देखील सुंदर आणि डोळ्यांना सुखावणारं आहे. कोंकण किंवा परदेशातच सुंदर चित्रण होतं असं नाही तर सोलापूरसारख्या जिल्यातदेखील निसर्ग सौंदर्य आहे हे सैराटच्या माध्यमातून दिसून येतं. नायक - नायिकेचा सहज, सुंदर अभिनय, ग्रामीण भाषेतले संवाद, काही विनोदी सीन्स, तब्बल पावणेतीन तासाची पण प्रवाही कथा या गोष्टीदेखील सैराटच्या यशाला कारणीभूत ठरतात. ग्रामीण भागातल्या लोकांना आपलासा वाटणारा आणि शहरी प्रेक्षकांना 'गोडगोड' चित्रपट पहायचा कंटाळा आला असेल तर थोडा वेगळा म्हणून आवडलेला, अशा कारणांनी सैराट लोकप्रिय झाला  आहे.
        सैराटकडे सामाजिक अंगानेदेखील पाहायला हवं. जातीवर आधारित उच्च-नीच भाव आणि त्यातून घडलेला जुलूम सैराटमध्ये दिसून येतो. शहरांमध्ये राहून, आधुनिकतेशी जवळीक असणाऱ्या जगात वावरणाऱ्या लोकांना जग खूप जवळ येउन आता 'ग्लोबल व्हीलेज' झालं आहे आणि भारत महासत्तेच्या दिशेने जोरात चालला आहे असं वाटणं साहजिक आहे. पण स्वतंत्र भारताच्या महासत्ता होण्याच्या मार्गावरती 'जात वास्तव' आणि 'धर्म वास्तव' यांचे काटे आहेत. जात आणि  धर्म  यांच्यामुळे विभागला गेलेला समाज घेऊन भारत महासत्ता होऊ शकणार नाही. शहरी भागांमध्येदेखील आर्थिक स्तर आणि जीवनमान यांवर आधारित विषमता आहेच, तिची दाहकता जातीआधारित विषमतेइतकी नाही इतकंच. विषमतेतून जुलूम जन्माला येतो आणि तोच जुलूम कोणाच्यातरी जीवावर उठतो. एकदा का उच्च-नीचता आहे हे मान्य केलं की सैराटची कथा वास्तववादी वाटायला लागते. जात म्हणजे जीवन जगण्याच्या पद्धतींमधला फरक असे मानलं तर ठीक आहे, पण आमचीच पद्धत योग्य आणि उच्च दर्जाची आणि इतरांची खालच्या दर्जाची ही मानसिकता चुकीची आहे.

        महाराष्ट्रातल्या राजकारण, शेती, सहकार आदी क्षेत्रांवर ज्या जातीचं वर्चस्व आहे त्या जातीतली नायिका आणि तथाकथित खालच्या जातीतला नायक यांच्या प्रेमप्रकरणाचं चित्रण सैराट मध्ये आहे. भारतातल्या जातीवर्गांमध्ये अजूनही जाती-आधारित प्रतिष्ठा महत्वाची मानली जाते आणि आंतरजातीय विवाहातून या प्रतिष्ठेला मोठा तडा जातो असा समज या जातींमध्ये प्रचलित आहे. त्यामुळेच आंतरजातीय प्रेमविवाहाच्या विरोधात जातीतले लोक उभे राहतात आणि कधीकधी त्यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकांमुळे 'ऑनर किलिंग' घडतं. काही जातींमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने जगाशी जोडले गेल्यामुळे या प्रतिष्ठेच्या संकल्पना पातळ  होत आहेत आणि आंतरजातीय प्रेमविवाहांना थोडीशी स्वीकारार्हता मिळत आहे. 'प्रेम करणं वेगळं आणि प्रेम निभावण वेगळं, संसार म्हणजे काय टाईमपास वाटला काय' अशा छापाची उत्तरं अशा गोष्टींना विरोध करणारे लोक देत असतात, पण म्हणून काही अशी प्रकरणं थांबणारी नाहीत, ती होतच राहणार, ती हाताळायची कशी हे समाजापुढचं आव्हान आहे. या आव्हानाकडे लक्ष न देता, ही प्रकरणं होणार कशी नाहीत या दिशेने प्रयत्न करून काहीही साध्य होणार नाही. समाजाची चाकं उलटी फिरवण्याचा हा प्रयत्न नेहमीच अयशस्वी होईल.  काही वर्षांपूर्वी कुठल्याही प्रकारचा प्रेमविवाहदेखील अप्रतिष्ठेचा मनाला जात होता, पण आता त्याला मिळालेली (थोडीशी) स्वीकारार्हता ही समाजाची चाके 'सुलटी' फिरत असल्याची द्योतक आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर या प्रेमिकांच्या संसारात काही अडीअडचणी येतात, भांडणे होतात काही वेळेला संसार तुटेपर्यंत या गोष्टी विकोपाला जातात (जे सैराटमध्येपण दाखवलं आहे) (या गोष्टी आंतरजातीय नसलेल्या  म्हणजेच सजातीय विवाहांमध्येपण येतात) त्याला सामोरे कसं जायचं ? या प्रश्नाला 'असे विवाहच व्हायला नकोत' असं ' उत्तर देणं म्हणजे तद्दन ढोंगीपणा आहे. नागराज मंजुळेंच्या 'फँन्ड्री' चित्रपटातल्या शेवटच्या सीनमध्ये नायक समाजाकडून मिळणाऱ्या हीन वागणुकीमुळे उद्विग्न होऊन एक मोठा दगड फेकतो आणि तो प्रेक्षकांच्या अंगावर येतो असं दाखवलं आहे, सैराटमध्येदेखील शेवटच्या सीन मधलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं जोडपं आणि त्यांच्या कडे पाहणारं त्यांचं मूल फँड्रीतल्या दगडासारखंच प्रेक्षकांच्या अंगावर येतं. खऱ्या आयुष्यातल्या प्रकरणांमध्येदेखील दोन पिढ्यांमधल्या 'समजून' घेण्याच्या 'गॅप' अर्थात अभावामुळे आई-वडील आणि मुलं यांना कायमचं दूर व्हावं लागतं, कधीकधी हे जग सोडून किंवा या जगामध्ये राहूनसुद्धा. हे वास्तव आणि आव्हान मांडण्याचं आणि त्याला कसं सामोरे जायचं 'नाही' हे सांगण्याचं काम सैराट करतो. अर्थात चित्रपटातली गाणी आणि प्रेमकथा लक्षात राहिली आणि छोटासा का होईना पण मांडलेला सामाजिक प्रश्न थिएटरातच विसरला हे होण्याची शक्यता जास्त आहे. जातवास्तवापलीकडे आणखी थोडं खोलात जाऊन पाहिलं, विचार केला तर तथाकथित उच्च मानल्या गेलेल्या आणि चित्रपटात दाखवल्या गेलेल्या जातीमध्ये आपल्या मुलाच्या वाढदिवसालादेखील श्रीमंतीचं आणि प्रतिष्ठेचं किती ओंगळ प्रदर्शन केलं जातं, हे खरंखुरं वास्तव देखील सैराट मध्ये दाखवलं आहे (अर्थात या वाढदिवसाच्या प्रसंगावरती चित्रीत केलेलं गाणं मात्र अत्यंत सुंदर जमून आलेलं आहे ). या जातीमध्ये स्त्रियांना किती प्रतिष्ठा असते हे नायिकेच्या आईच्या होणाऱ्या घुसमटीवरून दिसून येते, मनात असून देखील मतप्रदर्शनाचा अधिकार या आईला नाही, बडा घर पोकळ वासा याचंच हे प्रतीक (अर्थात या गोष्टींना वास्तव जीवनात अपवाददेखील आहेत, सरसकट उच्चजातीतल्या सर्व लोकांना हे लागू पडत नाही). दुसऱ्या एका सीन मध्ये नायक आणि नायिका पळून जाऊन लग्न केल्यानंतरच्या सर्व अडचणींना तोंड देत आपला संसार सुरू करतात, नोकऱ्यांमध्ये स्थिरावतात, स्वतःचा फ्लॅट पण  घेतात आणि  त्यानंतर एकेदिवशी जेव्हा ते गाडीवरून जात असतात तेव्हा रस्त्याच्या कडेला भगवे झेंडे घेऊन तरुण मुलामुलींना मारण्याचं काम संस्कृतीरक्षक करत असतात असं दाखवलं आहे. दिग्दर्शकानं फक्त प्रेमकहाणी म्हणून हा चित्रपट बनवला आहे खरा पण त्याच्या आडून त्यानं खूप काही सांगायचा प्रयत्न केला आहे.

        हे 'खूप काही' सांगितलेलं न  पटलेल्यांनी आणि अर्थातच काहींनी प्रामाणिकपणे, चित्रपट यशस्वी झाल्याच्या बातम्या येताच चित्रपटामुळे तरुण पिढी बिघडेल, सवंगपणा वाढेल अशा 'बाल किंवा युवा मनावर परिणाम छापाच्या' प्रतिक्रिया दिल्या.  सोशल-मीडिया वरून देखील सैराटविषयी उलट सुलट टीका-टिपण्ण्या झाल्या. सवंगतेचा कळस गाठलेल्या हिंदी चित्रपटांविषयी हे लोक कधी पेटून उठले नाहीत पण सैराट विरोधात यांच्या लेखण्या अगदी त्वरेने सरसावल्या (मराठी माणूस मराठी माणसाचे पाय ओढतो ते हेच असावे कदाचित). तसं पहायला गेलं तर 'कधी व्हनार तू माझ्या लेकराची आई' या वाक्यानं जर पिढी बिघडणार असेल तर  लहानपणापासून 'मै तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ' हे वाक्य ऐकलेली पिढी तर आत्तापर्यंत खड्ड्यात गेलेली असायला पाहिजे होती पण तसं काही झालेलं नाहीये. दिग्दर्शकाची जात पाहून आणि त्याला सैराटच्या निमित्ताने मिळालेलं प्रचंड यश पाहून अनेकांना पोटदुखी झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हेच जात-वास्तव आहे. कलेला जात, धर्म चिकटवू नये असं म्हटलं तरी तो असा चिकटतोच.

        सैराटच्या निमित्तानं बहुसंख्य तरुणाईचं झिंगाट होणं साहजिक आहे पण याच पिढीतले काहीजण अंतर्मुख होऊन विचार जरूर करणार आहेत, सैराटच्या यशाचं हे दुसरं परिमाण आहे. लेख संपवताना नटसम्राट मधलं एक वाक्य आठवतंय - 'देवळे पडू द्या, इमारती कोसळू द्या, नगरं कोलमडू द्या, फुलबागा जळू द्या, उघडया जमिनीवर पडलं आहे एक माणसाचं मूल, गुलाबी रंगाचं - गोजिरवाणं, आकाशाकडे पाहून हसतंय, सूर्याचे किरण धरण्यासाठी हात नाचवतंय. तेवढं मूल सांभाळा , फक्त तेवढं मूल सांभाळा', मानवजातीसमोर प्राधान्यानं काय असायला हवं ? तर ती माणुसकी, निरागसता, समृद्धीच्या-प्रतिष्ठेच्या-सुसंस्कृतपणाच्या आणि शिष्टाचारांच्या खोट्या कल्पनांपेक्षा महत्वाची. नटसम्राटमध्ये मुलांनी पालकांना नाकारलं, तर सैराटमध्ये वडिलांनी मुलांना नाकारलं. दोन्हींमध्ये झाला तो माणुसकीचा खूनच. या खूनांपासून आपल्याला जास्त धोका आहे. सैराट चित्रपट चांगला आहे की वाईट आहे, तो पाहायला पाहिजे की नाही हे सांगण्यासाठी हा लेख नाही. सांगायचंय एवढंच की एखाद्याने आपल्या समोर आरसा धरला आणि आपल्याला पाहिजे ती प्रतिमा त्यात दिसली नाही तर तो आरसा फोडण्याचा आणि तो आरसा धरणाऱ्याला देखील फोडण्याचा 'ब्रिगेडी'पणा कोणी करू नये. ती प्रतिमा, ते चित्र कसं बदलता येईल त्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

आईचा साठावा वाढदिवस

देखणी ती जीवने - महाराष्ट्रदिन विशेष