स्मरण जेआरडींचे

स्मरण जेआरडींचे, २९ नोव्हेंबर २०१८

२९ नोव्हेंबर १९९३ रोजी जेआरडी गेले, आज त्यांचा २५ वा स्मृतिदिन !

स्वातंत्र्योत्तर भारताच्या सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि पायाभूत सोयी आदी क्षेत्रातील प्रगतीची पायाभरणी जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली झाली तर औद्योगिक भारताची पायाभरणी जहांगीर रतन दादाभाई टाटा (जेआरडी) यांच्या नेतृत्वाखाली झाली. १८६८ सालीच टाटा उद्योगसमूहाची सुरुवात झाली होती. आधी जमशेटजी टाटा आणि नंतर दोराबजी टाटा यांनी १९३२ सालापर्यंत टाटासमूह बऱ्याच अंगानी मोठा केला होता. एम्प्रेस मिल, ताज हॉटेल, टाटा स्टील, टाटा पॉवर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा ऑइल मिल्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, इंडिया सिमेंट, टाटा कन्स्ट्रक्शन, टाटा इलेक्ट्रोकेमिकल्स, टाटा इंडस्ट्रियल बँक आदी संस्था आणि उद्योग १९३२ पर्यंत उभे राहिले होते. १९३२ ते १९३८ या काळात नवरोजजी सकलातवाला टाटा प्रमुख होते. त्यांच्या काळात टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ची सुरुवात झाली. १९३८ साली वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी टाटा समूहाची धुरा जेआरडींच्या हाती आली.  पुढची ५३ वर्षे ते समूहाचे अध्यक्ष होते. या ५३ वर्षांतील टाटांचा विस्तार स्तिमित करणारा आहे, त्यासोबतच हा विस्तार साकारणारे जेआरडी एक व्यक्ती म्हणून आणि त्यापेक्षाही उद्योगपती म्हणून सर्वांना आदर्श वाटावे असे आहेत. टाटा उद्योगसमूह व्यवसायाची १५० वर्षे पूर्ण करत असताना जेआरडींचं स्मरण करणे संयुक्तिक आहे.

जमशेटजी टाटांचे मामेभाऊ रतन दादाभाई टाटा (आर.डी. टाटा) आणि त्यांची पत्नी सुनी यांना २९ जुलै १९०४ रोजी मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचं नाव ठेवलं जहांगीर (जग जिंकणारा). योगायोग म्हणजे जमशेटजी १९०४ साली गेले आणि त्याच वर्षी जेआरडींचा जन्म झाला. जेआरडींचा जन्म फ्रान्समधला, त्यांची मातृभाषा देखील फ्रेंच. त्यांच्यावर सामाजिक, राजकीय संस्कार झाले ते फ्रान्सचेच. वयाच्या २० व्या वर्षी जहांगीर लष्करात दाखल झाले आणि एक वर्ष त्यांनी लष्करसेवा केली. जेआरडींचे वडील आर.डी. टाटा, टाटा समूहात दोराबजींच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. १९२५ साली आरडींच्या आदेशानुसार जहांगीर टाटा समूहात दाखल झाले. आरडींनी जहांगीर यांना सुरुवातीला जॉन पीटर्सन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला सांगितले. १९२६ ला जहांगीर टाटा स्टीलच्या सेवेत रुजू झाले, पण त्याच वर्षी आरडींचे फ्रान्समध्ये निधन झाले. आरडींच्या पश्चात जहांगीर यांच्याकडे टाटा समूहाचे संचालकपद आले. समूहप्रमुख सकलातवाला यांच्यासोबत जहांगीर मुंबईमध्ये काम करू लागले. जहांगीर आता जेआरडी होऊ लागले.

जेआरडींना लहानपणापासून विमानाचं आकर्षण होतं. पहिल्या महायुद्धात घरांवरून उडणारी लष्करी विमानंदेखील ते आवडीने पाहायचे. भारत देशाची स्वतःची विमान कंपनी असली पाहिजे असं त्यांच्या मनात होतं. १९३२ साली स्वतः कराची ते मुंबई विमान चालवून त्यांनी टाटा एव्हिएशन सर्व्हिसेसचा प्रारंभ केला. कराचीवरून भारतात टपाल आणणारी ही पहिली विमानसेवा. नंतर १९४८ साली त्यांनी एअर इंडिया इंटरनॅशनलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरु केली. स्वतंत्र भारताच्या पहिल्या राजदूत विजयालक्ष्मी पंडित यांना राजदूत म्हणून रशियात पोहोचवलं ते टाटांच्या विमानानंच. एअर इंडियाच्या वाढीसाठी आणि ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी जेआरडींनी प्रचंड मेहनत घेतली. पोटच्या पोराप्रमाणे त्यांनी एअर इंडियाला जपलं होतं. स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या आणि त्यांच्या मंत्र्यांच्या हट्टापायी एअर इंडियाचं सरकारीकरण झालं. जेआरडींना अत्यंत जवळच्या असणाऱ्या नेहरूंनी हे केलं होतं, त्याचा जेआरडींना प्रचंड मनस्ताप झाला.

नवरोजजी सकलातवाला यांच्या निधनानंतर १९३८ साली वयाच्या ३४ व्या वर्षी जेआरडींना एकमतानं टाटा समूहाचं प्रमुखपद देण्यात आलं. विमान कंपनी हे जेआरडींचं पहिलं स्वप्न तर रासायनिक पदार्थ निर्माण करणारी टाटा केमिकल्स हे दुसरं स्वप्न. दरबारी यांच्या मदतीनं जेआरडींनी हे स्वप्न साकारलं गुजरातेतल्या मिठापुरात. आधी स्वप्नं पाहायची, नंतर त्याचा ध्यास घ्यायचा आणि अपार मेहनत करून ती स्वप्नं साकारायची हा टाटा समूहाचा उद्योगमंत्र जेआरडींनी सहज आत्मसात केला होता.

जेआरडींनी तिसरी कंपनी जन्माला घातली ती रेल्वे इंजिन बनवणारी - टाटा लोकोमोटिव्ह अँड इंजिनीरिंग कंपनी. पण या कंपनीचे ग्राहक मर्यादित असल्याने नंतर या कंपनीचं रूपांतर करण्यात आलं वाहन निर्मिती कंपनीत, तीच ती पुण्याची नामवंत टेल्को कंपनी आणि आजची टाटा मोटर्स. सुरुवातीच्या काळात टेल्कोचे टाटा-४०७ ट्रक जागतिक कंपन्यांशी टक्कर देत होते. या टेल्कोचे प्रमुख होते सुमंत मुळगांवकर. मुळगावकरांनी ही कंपनी १९४९ ते १९८९ इतक्या प्रदीर्घ काळ सांभाळली. मुळगावकरांच्या नावाच्या आद्याक्षरांवरून पुढे टाटा सुमो गाडी बाजारात आली. याच टेल्कोने पुढे जाऊन संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली कार इंडिका बनवली. जेआरडींचं चौथं मोठं कार्य म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना. डॉ. होमी भाभांची कारकीर्द घडली ती याच संस्थेत. स्वातंत्र्योत्तर काळात टाटा समूहाला सरकारने सौंदर्य प्रसाधने बनवण्याविषयी विचारणा केली, त्यातून जन्माला आला सुप्रसिद्ध ब्रँड - लॅक्मे. वीजनिर्मिती, स्टील, वाहने, विमाने, केमिकल्स, विज्ञान, संशोधन, हॉटेल, सिमेंट आदी पायाभूत उद्योगांसहित जेआरडींना रस होता तो नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यात. यामुळेच १९६८ साली सुरुवात झाली टाटा कॉम्प्युटिंग सेंटरची. सुरुवातीला टाटांच्या कंपन्यांची अंतर्गत माहिती संगणकाद्वारे हाताळण्याचं काम ही कंपनी करत होती. जेआरडींनी एफ. सी. कोहलींना टाटा पॉवर मधून या नवीन कंपनीत आणलं. कोहलींनी कंपनीची क्षितिज विस्तारायला सुरुवात केली. कंपनी परदेशी कंपन्यांची कामे करू लागली. कोहलींनी भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची पायाभरणी भारतात केली. इंटरनेट सेवेचा प्रारंभ, १९९१ ला भारतात वाहू लागलेलं जागतिकीकरणाचं वारं आणि जेआरडींचे उत्तराधिकारी रतन टाटा यांची भक्कम साथ या जोरावर या कंपनीनं दमदार घोडदौड सुरु केली. हीच ती आजची चार लाख कामगार असलेली टाटा उद्योगसमूहाची सर्वात मोठी कंपनी - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. या कंपनीच्या जन्माचं निर्विवाद श्रेय जातं ते जेआरडींना. याच कंपनीने पुढे जाऊन रतन टाटांचा वारसदार समूहाला दिला - एन. चंद्रशेखरन. जेआरडींच्या कारकिर्दीतच टायटन इंडस्ट्रीज, व्होल्टास, टाटा सॉल्ट आदी नामवंत टाटा कंपन्यांची सुरुवात झाली होती.

जेआरडींचे वडील आर डी टाटा आणि नेहरूंचे वडील मोतीलाल यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यातूनच जवाहरलाल आणि जेआरडी एकमेकांचे जवळचे स्नेही बनून राहिले. दोन्ही कुटुंबांचा स्नेह इतका जवळचा की लॅक्मे सुरु करण्यासाठी जेआरडींना गळ घातली ती इंदिरा गांधींनी, इंदिराजींच्या लग्नाला उपस्थित राहिल्यामुळे जेआरडींनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या अगदी वडीलकीच्या नात्यातून. पण एअर इंडिया प्रकरण आणि नेहरूंचं समाजवादी धोरण यांमुळे जेआरडींचे नेहरूंशी मतभेद झाले, पण त्यांचं रूपांतर मनभेदात झालं नाही. पुढे जेआरडींनी इंदिराजींना आणीबाणीत साथ दिली होती. आणीबाणीनंतर इंदिराजींनी आणलेल्या मोनोपोलीज अँड रिस्टरीक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट मुळे जेआरडींना टाटा समूहाच्या व संचालकांच्या नेमणुकांमध्ये बदल करावा लागला. या बदलातून सक्षम झालेल्या टाटा कंपन्यांमधून एकेक सुभेदार तयार होऊ लागले. टाटांचे हे सुभेदार आणि कंपन्या एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचं चित्र निर्माण होऊ लागलं. टाटा समूह फुटणार अशा वावड्या ९० च्या दशकात उठू लागल्या. जेआरडींनी सर्व प्रसंगांना धैर्यानं तोंड दिलं पण त्याचवेळी समूहाची सूत्रं नव्या दमाच्या नवीन चेहऱ्याकडे देण्याची गरज त्यांना वाटू लागली. आणि १९९१ ला त्यांनी ही सूत्रं रतन टाटांकडे सोपवली. जेआरडींनी समूहाची सूत्रं स्वीकारली तेव्हा समूहाचा विस्तार १४ कंपन्या आणि १०० मिलियन डॉलर इतका होता, तर सूत्रं रतन टाटांकडे सोपवताना टाटा समूह ९५ कंपन्या आणि ५ बिलियन डॉलरचा झाला होता. १२३ वर्षांची परंपरा असलेला आणि उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेलेला टाटा समूह जेआरडींनी एकविसाव्या शतकात घेऊन जाण्यासाठी रतन टाटांना निवडलं होतं. जेआरडींची उत्तराधिकाऱ्याची निवड योग्य ठरली. समूहाचं टाटापण कायम ठेवत रतन टाटांनी यशस्वीरीत्या हे उद्योगतोरण उंच नेऊन ठेवलं, टाटांच्या नैतिकतेचे मापदंड त्यांनी अधिक सक्षम केले.

स्वतंत्र भारतामध्ये आजपर्यंत एकाच उद्योगपतीला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय, ते म्हणजे जेआरडींना. नोबेल पुरस्कार निवडसमितीवर त्यांनी काम केलं होतं. फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळाला होता. विविध आजारांनी थकलेला देह जेआरडींनी जिनिव्हा इथे ठेवला, तो दिवस होता २९ नोव्हेंबर १९९३. भारताच्या संसदेचं कामकाज फक्त संसदसदस्यांच्या निधनानंतर स्थगित करण्यात येतं, जेआरडींचं निधन मात्र या नियमाला अपवाद ठरलं होतं.आज जेआरडींचं २५ वं पुण्यस्मरण.

देशप्रेम, समाजाप्रती दातृत्वाची भावना, नैतिकतेचा नैसर्गिक स्वीकार, उत्तमोत्तम निर्मितीचा ध्यास, स्वप्नं पाहण्याची आणि साकारण्याची ताकद, नवनवीन उद्योगक्षेत्रांची आवड, यशाच्या शिखरावर देखील नम्रतेचं पालन ही टाटा समूहाची मूल्यं गेले १५० वर्षं जोपासली जात आहेत. यातील प्रदीर्घ अशा काळाचे साक्षीदार आणि निर्माते आहेत जेआरडी टाटा. उद्योगपतींनी मिळेल त्या मार्गानं नफेखोरी करणं, राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांच्याशी अभद्र युती करून उद्योगविस्तार करणं आणि इतकं करून वरती राष्ट्रप्रेमाचे बुरखे पांघरणं, या गोष्टी आज अपवाद नाहीत तर नियम होतील की काय अशी भीती आहे. या पार्श्वभूमीवर टाटांची उद्योगमूल्ये आणि टाटा व्यक्तिमत्वांची चरित्रं अभ्यासण्याजोगी आहेत. जेआरडींना त्रिवार सलाम !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

आईचा साठावा वाढदिवस

देखणी ती जीवने - महाराष्ट्रदिन विशेष