अन पुन्हा पसरो मनावर सत्यतेचे चांदणे

मुलांना जन्म देताना आपला मुलगा गुंड-मवाली होईल, अफरातफर, फसवाफसवी करेल असं कुठल्याच आई-वडिलांना माहित नसतं. पण प्रत्यक्ष जर तसं झालं तर जे दुःख त्या माता-पित्यांना होतं त्याचं वर्णन होऊ शकत नाही. माणसांप्रमाणेच वस्तूंचं आणि तंत्रज्ञानाचं असतं. एखाद्या वस्तूच्या, तंत्राच्या उपयुक्ततेपेक्षा त्याचे तोटेच जर जास्त झाले तर या वस्तूच्या निर्माणकर्त्यावर पश्चातापाची वेळ येते. हिरोशिमा-नागासाकीच्या विध्वंसानंतर अणुशास्त्रज्ञांना असाच पश्चाताप झाला होता. एकविसाव्या शतकात अशीच पश्चातापाची वेळ एका कंपनीवर आली असावी असं वाटण्यास काहीच हरकत नाही. कारण आमच्या तंत्राचा, सेवेचा वापर 'सत्य' आणि 'प्रेम' पसरवण्यासाठी करा, 'असत्य' आणि 'द्वेष' पसरवू नका अशी मोठी जाहिरात करण्याची वेळ या कंपनीवर आली. हे लाडकं तंत्र, म्हणजेच मोबाईलवरील सुप्रसिद्ध अँप - whatsapp. अल्पावधीतच थोरांपासून पोरांपर्यंत whatsapp लोकप्रिय झालं, माहिती-मेसेजेस इकडून तिकडे पळू लागले, माणसे जवळ आली पण त्यानंतर मात्र हे मेसेजेस सर्वात आधी पाठवण्याच्या घाईत त्याची सत्यता पडताळून पाहायचे भान सुटले. हे भान इतके सुटले की मग कोणत्या तरी कंपनीतली नोकरभरती इथंपासून चीन मधून येणारे विषारी फटाके या कोणत्याही माहितीची फास्ट-फॉरवर्ड पद्धतीने चलती सुरु झाली. काही ठिकाणी झालेल्या जातीय दंगलींमध्ये तेल ओतण्याचं काम पण समाजकंटकांनी whatsapp च्या माध्यमातून केलं, हा विखार इतका पसरला की दंगलग्रस्त भागांमध्ये सरकारला मोबाईल डेटा बंद ठेवण्याची वेळ आली. हे फक्त भारतातच घडलं असं नाही. सर्वच प्रगत-अप्रगत देशांत हे घडत गेलं. राजकारण असो की समाजकारण, शहर असो की खेडं, अमेरिका असो की भारत, अमेरिकेची निवडणूक असो की इंग्लंडमधलं ब्रेक्सिट, यत्र-तत्र-सर्वत्र अपप्रचाराचा फ़ैलाव झाला झाला आणि शेवटी whatsapp च्या निर्माणकर्त्यांनी या अपप्रचाराला रोखण्यासाठी सर्वच देशांत, सर्वच भाषांमधून एक जाहिरात मोहीम चालवावी लागली. या जाहिरात मोहिमा होऊनही हा अपप्रचार कमी झाला आहे असं दिसत नाही. 'पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार' असं गदिमांनी म्हटलंय त्याप्रमाणे 'सत्यमेव जयते'च्या भारत देशात असत्यालाच मणिहार घालून सजवलं जातंय.

२०१९ मध्ये प्रवेश करताना भारत आता स्वप्नाच्या विमानातून सत्याच्या जमिनीवर प्रवेश करेल. सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या असल्यानं भारताचं समाजमन पुन्हा ढवळून निघेल. प्रचाराच्या सोबत अपप्रचाराच्या फ़ैरी झडतील. आणि जनता 'स्वप्नातून सत्याकडे' न वळता 'स्वप्नाकडून असत्याकडे, द्वेषाकडे, धार्मिकतेकडे आणि शेवटी भावनिकतेकडे' वळेल असे प्रयत्न देशात घडतील. जनतेने प्रश्न न विचारता भक्तिभावाने पूजा करावी, असत्यालाच सत्य समजून मेसेजेस फॉरवर्ड करावे किंवा मग राष्ट्रवादाचा कैफ जनतेने चढवून घ्यावा यासाठी राजकारण्यांच्या सोशल मीडिया टीम्स कामाला लागतील. आणि मग प्रत्येकजण आपल्या राजकीय कलानुसार whatsapp, facebook युनिव्हर्सिटीत मेसेजेसचा रतीब घालेल. कुणीतरी फॉरवर्ड केलेल्या माहितीवर क्षणभराचाही विचार न करता प्रत्येकजण भाळून गेला आणि त्या माहितीचे डोस इतरांना देऊ लागला तर तुमच्या whatsapp ग्रुपवर आणि फेसबुक पेजवर कशाचा पूर येईल याची कल्पनाच केलेली बरी. म्हणूनच नवीन वर्षात समाजमाध्यमांचा वापर करताना हृदयापेक्षा मेंदू आणि भावनेपेक्षा विचार जागृत ठेवणं जास्त गरजेचं आहे.

प्रत्येकाला राजकीय मत असण्याचा अधिकार आहे.  पण हे राजकीय मत जेव्हा गलिच्छ ( चोर, विधवा, निकम्मा इत्यादी ) शब्दात मांडलं जाईल आणि ते कुणीतरी भारावून जाऊन तसेच्या तसे फॉरवर्ड करेल तेव्हा हे फक्त मत राहणार नाही तर तो द्वेष उत्पन्न करणारा अशक्य कोटीतला अपराध ठरेल. एकाच्या चुकीला दुसऱ्याने पण चुकीचे उत्तर दिले तर, या साखळी प्रतिक्रियांचा (chain reactions चा) शेवट कशात होणार ? आणि मग धर्म आणि भावनांच्या आहारी जाऊन आणि राष्ट्रवादाच्या उदात्तीकरणातून विकासाचा विचार कधी होणार ? सुप्रीम कोर्टाचा निकाल असो वा सरकारचा निर्णय किंवा मग विरोधकांचा आरोप, कुठलीच गोष्ट एका वाक्यात समजण्यासारखी नसते. पण सर्व बाजूंचा विचार करण्याचा क्लास whatsapp युनिव्हर्सिटीत घेतला जात नसल्याने तो धडा आपल्यापैकी बहुतेक लोकांनी गिरवलेलाच नाही. या बाजू समजण्यासाठी थोडा patience, वाचण्याची, समजून घेण्याची इच्छा असावी लागते. या सर्वांच्या अभावामुळे 'लबाड जोडिती इमले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या' अशीच आपली अवस्था आलेली आहे.

असं असेल तर मग अजब भारताच्या नवीन वर्षातल्या पुढच्या १५० दिवसांच्या गजब वाटचालीसाठी - 'अन पुन्हा पसरो मनावर सत्यतेचे चांदणे', अशी एकच सदिच्छा व्यक्त करायला पाहिजे. मागच्या वर्षी 'शुद्धतेचे चांदणे' म्हटलं होतं, यावर्षी 'सत्यतेचे'. राहता राहिला प्रश्न तंत्रज्ञानाचा. त्या बिचाऱ्याला ना असतो चेहरा ना असतो भाव, आपणच त्याचा चेहरा. त्या तंत्राला वापरून चांगलं काही करणारे लोक आहेतच की, त्या लोकांना अल्पमतात न ठेवता बहुमतात आणणे हाच ज्ञान-तंत्रज्ञानाचा विजय. जमलं तर एक संकल्प करूयात - फॉरवर्ड करण्याआधी आणि लाईक करण्याआधी दोनदा वाचूयात. २०१९ च्या सदिच्छा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

आईचा साठावा वाढदिवस

देखणी ती जीवने - महाराष्ट्रदिन विशेष